खराब फॉर्ममधून कसे बाहेर यायचे आणि भारतीय संघात पुन्हा कसे स्थान मिळवायचे याबाबत क्रिकेटपटू हरभजनसिंग याने दिलेल्या मौलिक सूचना मला खूप प्रोत्साहन देणाऱ्या ठरल्या. त्यामुळेच मी पुन्हा भारतीय हॉकी संघात स्थान मिळवू शकलो असे ड्रॅगफ्लिकर संदीपसिंग याने येथे सांगितले.
लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत भारतास शेवटचे स्थान मिळाले होते. त्यामुळे संदीपसिंग याला संघातून डच्चू देण्यात आला होता. आशियाई चॅम्पियन्स, चॅम्पियन्स चषक, अझलान शाह चषक व जागतिक लीग (दुसरी फेरी) या स्पर्धामध्ये त्याला भारतीय संघात स्थान मिळू शकले नव्हते. मात्र आगामी जागतिक लीग (तिसरी फेरी) स्पर्धेकरिता संदीपसिंग याला पुन्हा भारतीय संघात पाचारण करण्यात आले आहे.
भारतीय संघातील पुनरागमनाचे श्रेय भज्जीला देत संदीपसिंग म्हणाला, भज्जी हा माझा अतिशय जवळचा मित्र आहे. कठोर परिश्रमाऐवजी थोडासा वेळ आपल्या कुटुंबीयांसमवेत देण्याचा सल्ला त्याने मला दिला. त्याप्रमाणे मी माझ्या कुटुंबीयांसमवेत व मित्रपरिवारामध्ये घालविला. त्यामुळे मला खूप आराम मिळाला. एकीकडे मी थोडासा नियमित सरावही सुरू ठेवला. माझ्या खेळात काय दोष आहेत याचा मी बारकाईने अभ्यास केला. मी प्रत्येक सराव शिबिरात भाग घेतला तसेच हॉकी इंडिया लीगमध्येही एकाग्रतेने खेळलो आणि हेच कष्ट मला भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी उपयुक्त ठरले.
बचाव तंत्रात मी कमी पडत होतो त्यामुळेच मला भारतीय संघातून वगळण्यात आले होते. हा कमकुवतपणा घालविण्यासाठी मी खूप प्रयत्न केले असेही संदीपसिंग याने सांगितले.