मुंबई : महिलांच्या ५० मीटर प्रोन प्रकारात कनिष्ठ गटातील राष्ट्रीय विजेत्या १८ वर्षीय भक्ती खामकरने दोन सुवर्णपदकांसह ३६व्या राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत दुहेरी मुकुटाचा मान मिळवला. तिने वरिष्ठ आणि कनिष्ठ महिला गटांमध्ये ही सुवर्णपदके जिंकली. मुंबई शहरच्या या खेळाडूने ६०० पैकी ५९४ गुणांची कमाई केली. पुरुष गटातील विजेत्या खेळाडूच्या गुणांशीही तिने बरोबरी केली. वरळी येथील महाराष्ट्र रायफल संघटनेच्या नेमबाजी केंद्रावर सुरू असलेल्या या स्पर्धेत पुरुष गटात कोल्हापूरच्या इंद्रजीत मोहितेने ५९४ गुणांसह विजेतेपद पटकावले. रत्नागिरीच्या पुष्कराज इंगोले आणि मुंबईच्या विश्वजित शिंदे यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक पटकावले.

२५ मीटर स्टँडर्ड पिस्तूल प्रकारात पुण्याचा आंतरराष्ट्रीय नेमबाज विक्रांत घैसासने सुवर्णवेध घेतला. या गटात रोनक पंडित आणि १४ वर्षीय हर्षवर्धन यादव यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदके जिंकली. २५ मीटर रॅपिड फायरमध्ये सुवर्ण जिंकणाऱ्या हर्षवर्धनने स्टँडर्ड प्रकारातही कनिष्ठ गटात सुवर्ण जिंकले.