भारताची महिला ग्रँडमास्टर भक्ती कुलकर्णीने बुधवारी सहाव्या फेरीत उझबेस्तिानच्या गुलरुखबेगीम टोखिजरेनोव्हाविरुद्ध बरोबरी करून आशियाई महिला बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेतील आघाडी कायम राखली. या अनिर्णीत निकालानंतर भक्तीच्या खात्यात एकूण पाच गुण जमा झाले आहेत आणि अध्र्या गुणांच्या फरकाने कझाकिस्तानची डिनारा सडूआकासोवा, चीनची ली झुएयरी आणि टोखिजरेनोव्हा संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानावर आहेत.
या स्पध्रेच्या तीन फेऱ्या शिल्लक असून भारताची सौम्या स्वामीनाथन ४ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. सहाव्या फेरीत सौम्याने दमदार पुनरागमन करताना व्हिएतनामच्या फॅम ले थाओ गुयेनचा पराभव केला.
भारताची आघाडीची बुद्धिबळपटू पद्मिनी राऊतला अव्वल स्थानासाठी नशिबाची साथ मिळवण्याची आवश्यकता आहे. सहाव्या फेरीत भारताच्याच आर. वैशालीने तिला बरोबरीवर समाधान मानण्यास भाग पाडले.