T20 World Cup IND vs SL : टी २० विश्वचषक २०२० स्पर्धेत भारताने श्रीलंकेच्या संघाचा ७ गडी राखून सहज पराभव केला. श्रीलंकेची कर्णधार चमारी अटापटू (३३) आणि दिलहारी (नाबाद २५) यांच्या खेळीमुळे श्रीलंकेने २० षटकात भारताला ११४ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना शफाली वर्माने धडाकेबाज ४७ धावांची खेळी केली आणि भारताला विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने साखळी फेरीतील चारही सामने जिंकत अ गटात अव्वल स्थान कायम राखले. चार बळी मिळवणाऱ्या राधा यादवला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

अरेरे! शफाली सलग दुसऱ्यांदा ठरली कमनशिबी

हा सामना सुरू असताना मैदानाबाहेरही एक सामना रंगलेला पाहायला मिळाला. भारत आर्मी आणि श्रीलंकन चाहते असे दोन गट सामना पाहायला आले होते. त्यांनी त्यांच्यासोबत काही वाद्य आणली होती. आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी ते जल्लोष करत होते आणि वाद्य वाजवून स्टेडियममधील वातावरण प्रसन्न ठेवत होते. त्यावेळी समालोचक आणि सूत्रसंचालक रिदिमा हिने या दोघांमध्ये एक सामना होऊ जाऊ द्या असं म्हटलं. त्यानुसार दोन्ही गटांनी दमदार असं वादन केलं. त्यामुळे रिदिमा स्वत:देखील बुचकळ्यात पडली आणि तिने विजेता कोण याचा निर्णय चाहत्यांवरच सो़डून दिला.

T20 World Cup IND vs SL : शफालीचा धडाका; भारताचा विजयी ‘चौकार’

भारताने लगावला विजयी ‘चौकार’

श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, पण त्यांचा निर्णय पूर्णपणे चुकला. श्रीलंकेची कर्णधार चमारी अटापटू हिने सर्वाधिक ३३ धावा केल्या. त्यात ५ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता, पण मोठा फटका मारताना ती झेलबाद झाली. हर्षिता माधवीने तिला चांगली साथ देत १७ चेंडूत १२ धावा केल्या. अटापटू बाद झाल्यावर श्रीलंकेच्या डावाला गळती लागली. अखेरच्या टप्प्यात दिलहारीने नाबाद २५ धावा करून श्रीलंकेला ११३ धावांपर्यंत पोहोचवले. राधा यादवने ४, राजेश्वरी गायकवाडने २ तर शिखा, पूनम आणि दिप्तीने १-१ बळी टिपला.

११४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अनुभवी सलामीवीर स्मृती मानधना हिने दमदार सुरूवात केली होती, पण फटकेबाजीच्या प्रयत्नात स्मृती माघारी परतली. तिने ३ चौकारांसह १२ चेंडूत १७ धावा केल्या. फॉर्मशी झगडत असलेली भारतीय कर्णधार हरमनप्रीत पुन्हा अपयशी ठरली. १५ धावांची खेळी केल्यावर ती उंच फचका मारून झेलबाद झाली. शफालीदेखील ४७ धावांवर माघारी परतली. त्यानंतर रॉड्रीग्ज (१५*) आणि दिप्ती शर्मा (१५*) यांनी भारताला विजयी ‘चौकार’ मिळवून दिला.