काल्हेर, ठाणे येथे सुरू असलेल्या आठव्या औद्योगिक राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत भारत पेट्रोलियम, एअर इंडिया यांच्यासह महिंद्रा आणि ओएनजीसी संघांनी उपांत्य फेरी गाठली.
एअर इंडियाने ५-५ चढायांच्या जादा डावात स्टेट बँक ऑफ म्हैसूरवर २७-२५ असा विजय मिळवला. एन. रणजीत आणि मोनू या विजयाचे शिल्पकार ठरले. भारत पेट्रोलियमने महाराष्ट्र पोलिसांचे आव्हान २२-१७ असे संपुष्टात आणले. पेट्रोलियम संघाच्या विजयात जितेश जोशी, सुनील आडके, परेश म्हात्रे, नीलेश शिंदे चमकले. महिंद्राने इंडो तिबेट संघावर ३१-१७ अशी मात केली. नीलेश साळुंखे, आनंद पाटील, स्वप्निल शिंदे यांनी दिमाखदार खेळ केला. ओएनजीसीने विजया बँकेला ३८-१३ असे नमवले. संदीप नरवालच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर ओएनजीसीने विजय साकारला.
महिलांच्या राज्यस्तरीय स्पर्धेत राजमाता जिजाऊ, मुंबई पोलीस, नवशक्ती संघांनी उपांत्य फेरी गाठली. जिजाऊ संघाने अमरहिंदचा ३३-६ असा धुव्वा उडवला. स्नेहल शिंदे, नेहा घाडगे, अंकिता जगताप आणि सायली केरीपाळे यांच्या दमदार खेळाच्या जोरावर जिजाऊने बाजी मारली.
मुंबई पोलिसांनी संघर्ष संघावर १२-१० असा विजय मिळवला. शिरीषा शेलार, भक्ती इंदुलकर, कल्याणी विचारे यांनी विजयात निर्णायक भूमिका बजावली. नवशक्तीने महात्मा गांधी संघाचा १७-१५ असा पराभव केला.