ऑलिम्पिक धावपटू कविता राऊत, जागतिक मॅरेथॉनपटू मोनिका आथरे, जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक मिळवणारी संजीवनी जाधव, आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घालणारी अंजना ठमके, याशिवाय किसन तडवी, दुर्गा देवरे, ताई बामणे, प्रगती मुळाणे अशी अनेक नावे नाशिकशी नाते सांगतात. अ‍ॅथलेटिक्स क्षेत्रात नाशिकचे नाव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणारी ही गुणवत्ता भोसला सैनिकी मैदानावरून पुढे आली आहे. भोसलाचे मैदान म्हणजे जणू काही धावपटू घडवणारी ‘फॅक्टरी’च झाली आहे. या फॅक्टरीचे संचालक आहेत विजेंद्र सिंग.

धावण्याची शर्यत देशात-परदेशात कुठेही असो, त्यात नाशिकचा एकतरी खेळाडू हमखास असतोच. देशांतर्गत स्पध्रेत नाशिकचा खेळाडू म्हणजे पहिल्या तिघांमध्येच असणार, हे समीकरण आता जणू काही रूढ झाले आहे. त्याचे संपूर्ण श्रेय भारतीय क्रीडा प्राधिकरण अर्थात ‘साई’च्या नाशिक येथील अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना दिले जाते. या केंद्रावर कधी काळी केवळ १५ ते २० दरम्यान असणारी खेळाडूंची संख्या सिंग यांच्या प्रयत्नांमुळे आज सत्तरच्या घरात गेली आहे. भोसला सैनिकी विद्यालयाच्या सहकार्याने ‘साई’चे अ‍ॅथलेटिक्स केंद्र त्यांच्याच मैदानावर सुरू आहे. सकाळ, सायंकाळ हे मैदान धावपटूंनी गजबजलेले असते. विभागीय क्रीडा संकुलात सिंथेटिक ट्रॅक तयार झाल्याने काही खेळाडूंना मागील दोन वर्षांपासून सायंकाळी त्या ठिकाणीही सरावासाठी नेले जात आहे. धावण्याच्या शर्यतींमध्ये नाशिकला वेगळी ओळख निर्माण करून देण्यात महत्त्वपूर्ण वाटा असलेले सिंग १९९१मध्ये नाशिकला आले. कविता राऊतमुळे सिंग यांच्या नावाभोवती वलय निर्माण झाले असले तरी त्याआधीही त्यांनी या केंद्रातून किमान ३५ तरी राष्ट्रीय खेळाडू घडवले. त्यात प्रामुख्याने थाळीफेकपटू महम्मद अक्रम, धावपटू मिनी सुवर्णा, गणेश सिंग, शिवप्रताप, चालण्याच्या शर्यतीत सुप्रिया आदक, अडथळ्यांच्या शर्यतीत दीपिका वारके यांची नावे घ्यावी लागतील.

गुणवत्ता सर्वत्र असते, परंतु ती ओळखण्याची नजर असावी लागते असे म्हणतात. हीच गोष्ट सिंग यांना इतर प्रशिक्षकांपेक्षा वेगळे करण्यास पुरेशी ठरते. कविता राऊत, अंजना ठमके, मोनिका आथरे आणि संजीवनी जाधव या सर्वामध्ये एक धावपटूसाठी लागणारी गुणवत्ता ठासून भरलेली होती. आपण फक्त त्यांना तांत्रिकदृष्टय़ा चकाकी दिली, असे सिंग यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्रात अ‍ॅथलेटिक्स केंद्र आणि प्रशिक्षकांची वानवा आहे. असे असताना सिंग यांच्या मार्गदर्शनाखालील धावपटूच मैदान गाजवण्यामागील कारण तरी काय, सिंग यांची खेळाडूंची निवड करण्याची पद्धत आहे तरी कशी, असे प्रश्न अनेकांना पडतात.

सिंग हे शालेय स्पर्धा, ‘पायका’ अंतर्गत होणाऱ्या स्पर्धावर अधिक नजर ठेवून असतात. या स्पर्धामध्ये बऱ्यापैकी कामगिरी करणारा एखादा धावपटू नजरेत भरल्यावर ते त्याच्या पालकांशी संपर्क साधून त्या धावपटूला भोसला विद्यालयात प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात. हेतू हा की त्याला धावण्याचा सराव करण्यासाठी फार दूर जावे लागू नये. कवितासह दत्ता बोरसे, किसन तडवी, अंजना ठमके, संजीवनी जाधव यांना अशाच पध्दतीने सिंग यांनी निवडले. कविता राऊतच्या वाढदिवसानिमित्त हरसूल येथे दरवर्षी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आदिवासी भागातील गुणवत्ता हेरण्यासाठी धावण्याची शर्यत घेतली जाते. अशा र्शयतीमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला पैलू पाडण्यासाठी सिंग तयारच असतात. राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय शालेय स्पर्धामध्ये अलीकडेच गाजणारे नाव म्हणजे ताई बामणे. तिलाही सिंग यांनी अशाच शर्यतीतून हेरले. सरावाप्रसंगी संतापल्यावरही खेळाडूंना सिंग हे आपलेसे वाटण्याची अनेक कारणे आहेत. सिंग हे खेळाडूंच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. उच्चतम कामगिरीसाठी खेळाडू केवळ शारीरिकदृष्टय़ा नव्हे, तर मानसिकदृष्टय़ाही तंदुरुस्त असावा लागतो, याची जाण असल्याने एखाद्या खेळाडूची कामगिरी समाधानकारक होत नसल्यास सिंग हे त्याच्या घरातील स्थिती, वाद, समस्या यांविषयी जाणून घेत त्यावर काही उपाय शोधता येईल काय, याचा प्रयत्न करतात. परिणामी खेळाडूंना त्यांचा अधिकच आधार वाटू लागतो. त्याचे प्रतिबिंब त्यांच्या कामगिरीत उमटते.

सिंग यांना मदत करण्यासाठी अनेक हात पुढे आले आहेत. भोसला सैनिकी विद्यालयाने तर मैदान उपलब्ध करून देण्यासह ग्रामीण भागातील खेळाडूंना विद्यालयात अत्यल्प शुल्कात प्रवेश देण्यापासून त्यांची वसतिगृहात निवास व्यवस्था करेपर्यंत मदत केली आहे. याशिवाय आहार आणि धावपटूंसाठी लागणाऱ्या साहित्याचा खर्च खेळाडूंना पेलावा लागू नये, यासाठी गुणवंत अशा १० खेळाडूंना महिंद्रा कंपनी २०११पासून दत्तक घेत आहे. त्यांना प्रत्येक वर्षी १२ लाख ५० हजार रुपयांची मदत दिली जाते. बॉश कंपनीनेही काही खेळाडूंना क्रीडावृत्ती सुरू केली आहे. याशिवाय येथील कोणत्याही खेळाडूला दुखापत झाल्यास शहरातील अनेक क्रीडाप्रेमी डॉक्टर मंडळी मोबदल्याची अपेक्षा न करता उपचारासाठी तयार असतात.

महिंद्रा कंपनी २०११ वर्षांपासून १० खेळाडूंचा सर्व खर्च करत आहे. त्याप्रमाणे बॉश कंपनीने किसन तडवी, अभिजित हिरकूड, पूनम सोनुने, ‘गेल’ने ताई बामणे यांना दत्तक घेतले आहे. धावपटू म्हणून नोंदवलेल्या कामगिरीमुळे या मैदानावरील ३०पेक्षा अधिक खेळाडूंना विविध ठिकाणी नोकरी मिळाली आहे. त्यात कविता राऊत, मोनिका आथरे, सुरेश वाघ ही प्रमुख नावे. भोसला सैनिकी मैदानावर सराव करणाऱ्या ताई बामणे, आरती पाटील, पूनम सोनुने, प्रगती मुळाणे यांच्या कामगिरीकडे आता सर्वाचे लक्ष राहणार आहे.

नाशिकचे हवामान आणि नैसर्गिक परिस्थिती ही मध्यम आणि लांब पल्ल्याच्या धावपटूंसाठी योग्य आहे. त्यामुळेच अशा र्शयतीमध्ये चांगली कामगिरी करू शकतील असे धावपटू घडविण्याकडे जास्त लक्ष देण्यात येत आहे. नाशिकच्या ग्रामीण भागात विशेषत: आदिवासी भागात लहानपणापासून अनेक अडथळ्यांवर मात करून विद्यार्थ्यांना शिक्षणाची वाट धुंडाळावी लागते. काही ठिकाणी त्यांना शिक्षणासाठी कित्येक मैल दररोज पायी जावे लागते. त्यामुळे या मुलांना काही मीटरचे अंतर धावणे यात काहीच विशेष वाटत नाही. कष्ट करण्याचीही त्यांची तयारी असते. नाशिकमधून आजपर्यंत भोसलाच्या मैदानावरून साठपेक्षा अधिक राष्ट्रीय धावपटू तयार होण्यामागील कारण हेच आहे. नाशिककरांकडून मिळणारे सहकार्य आणि प्रोत्साहन यामुळे भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर नाशिकचे नाव सदैव गाजत राहील हे निश्चित.   – विजेंद्र सिंग, अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षक

सावरपाडासारख्या एका आदिवासी पाडय़ातून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहचवणाऱ्या भोसला सैनिकी मैदानाशी माझे विशेष नाते निर्माण झाले आहे. याच मैदानावर धावण्याचे प्राथमिक धडे गिरवले. मैदानालगतच विद्यालय, महाविद्यालय असल्याने वेळेची बचत होऊन खेळाडूंना त्याचा फायदा होतो. प्रशिक्षक विजेंद्र सिंग हे प्रत्येक खेळाडूचे बारकावे हेरून मदत करीत असल्याने यापुढेही नाशिकच्या धावपटूंचे भविष्य निश्चितच उज्ज्वल आहे. माझ्यासारख्या अनेक कविता राऊत या ठिकाणी रांगेत आहेत. इतकी येथील खेळाडूंची फळी मजबूत आहे.    – कविता राऊत, आंतरराष्ट्रीय धावपटू