भारतीय संघाचा मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि त्याच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. भुवनेश्वरच्या वडिलांनी याबाबत मेरठ पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. जमिनीच्या एका व्यवहारात या दोघांना धमकी देण्यात आल्याचे समजते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुवनेश्वर कुमारचे वडील किरणपाल सिंग यांनी बुलंदशहरच्या बरारी गावातील रहिवासी रणवीर सिंह याच्याशी ८० लाख रुपयांत जमिनीचा व्यवहार केला होता. भुवनेश्वरच्या वडिलांनी ही रक्कम इंटरनेट बँकिंगद्वारे जमा केली होती. या जमिनीचा सौदा एप्रिलमध्ये होणार होता. पण एका हत्येच्या प्रकरणात रणवीर सिंह बुलंदशहरच्या तुरूंगात आहे, त्यामुळे अद्याप रणवीर सिंह याने जमिनीची मालकी भुवनेश्वर कुमारच्या वडीलांच्या नावावर केलेली नाही. त्याचे कुटुंबिय देखील जमीन नावावर करण्यास टाळाटाळ करीत आहेत. पैस परत देण्यासही तयार होत नाहीत. पैसे परत करण्याची मागणी केल्यानंतर आरोपी रणवीर सिंहने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप भुवनेश्वरच्या वडिलांना केला आहे.