पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत मांडीचे स्नायू दुखावल्यामुळे भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आता विश्वचषक स्पर्धेतील पुढील किमान तीन सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही.

स्वत:चे तिसरे षटक टाकताना मैदानातील काहीशा खोलगट भागात डावा पाय पडल्यानंतर त्याच्या मांडीचे स्नायू ताणले गेले होते. त्यामुळे त्याला तात्काळ मैदान सोडावे लागले. आता पुढील सामन्यांमध्ये त्याची जागा मोहम्मद शमी घेणार आहे.

‘‘गोलंदाजी करताना मांडीचे स्नायू काही प्रमाणात ताणले गेल्यामुळे त्याला वेदना होत होत्या. कदाचित तो दोन ते तीन सामन्यांसाठी खेळू शकणार नाही. पण विश्वचषकातील महत्त्वाच्या टप्प्यात तो भारतीय संघासाठी उपलब्ध असेल. भुवीसारखा गोलंदाज भारतासाठी खूपच महत्त्वाचा आहे. शमी त्याच्या जागी खेळू शकेल,’’ असे कर्णधार विराट कोहलीने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सांगितले.

विश्वचषक स्पर्धेतील दुसरे शतक झळकावणाऱ्या रोहित शर्माची कोहलीने भरभरून स्तुती केली. तो म्हणाला, ‘‘रोहितची खेळी पुन्हा एकदा भारतीय संघासाठी महत्त्वपूर्ण ठरली. एकदिवसीय क्रिकेटमधील चांगला खेळाडू आहे, हे दाखवून देण्यासाठी रोहितला लोकेश राहुलची मदत झाली. सांघिक कामगिरीमुळेच भारताला ५ बाद ३३६ धावा उभारता आल्या. कुलदीप यादवने बाबर आझमला बाद करण्यासाठी टाकलेला तो चेंडू अप्रतिम होता.’’

भारतीय संघाला दोन दिवसांची विश्रांती

विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध वर्चस्व गाजवणारा विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ विजयाचा जल्लोष करण्यासाठी दोन दिवसांची विश्रांती घेणार आहे. भारताने ८९ धावांनी विजय मिळवत विश्वचषकात पाकिस्तानला सातव्यांदा पराभवाची धूळ चारली. भारताचा पुढील सामना २२ जून रोजी अफगाणिस्तानशी होणार आहे. त्यासाठी भारतीय संघ दोन दिवसांची विश्रांती घेणार आहे, असे संघ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. सलामीवीर शिखर धवन आणि वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार जायबंदी असल्यामुळे ही विश्रांती त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.

मी कधीही लय गमावली नाही -कुलदीप

कुलदीप यादव पुन्हा एकदा लयीत परतला, ही स्तुती ऐकून तो स्वत: निराश झाला आहे. मी कधीही माझी लय आणि अव्वल स्थान गमावलेले नाही, अशा शब्दांत त्याने नाराजी व्यक्त केली. ‘‘प्रत्येक जण माझ्या लयीबाबत चर्चा करत आहे. पण मी कधीही लय गमावलेली नाही. बाबर आझमला बाद करण्यासाठी टाकलेला चेंडू तो माझ्या सर्वोत्तम चेंडूंपैकी एक होता. बाबर आणि फखर झमान चांगली फलंदाजी करत असताना त्यांची जोडी फोडणे आमच्यासाठी महत्त्वपूर्ण होते. दोघांनाही मी बाद केल्यानंतर सामना आमच्या पारडय़ात झुकला,’’ असे कुलदीपने सांगितले.

भारतीय संघ ७०च्या दशकातील विंडीजसारखा -श्रीकांत

भारताचे माजी सलामीवीर कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची तुलना ७०च्या दशकातील वेस्ट इंडिज संघाशी केली आहे. ‘‘प्रत्येक प्रतिस्पर्धी संघ भारताला दचकून आहे. १९७०च्या दशकात वेस्ट इंडिजने आपली दहशत निर्माण केली होती. त्याचप्रमाणे भारतीय संघाचा सामना करताना काही संघांमध्ये भीती आहे. त्यामुळेच प्रतिस्पर्धी संघ काहीसा मागे पडत आहे. रोहित शर्मा हा चांगला फलंदाज आहे, हे सर्वानाच माहीत आहे. पण पाकिस्तानविरुद्धची महत्त्वपूर्ण खेळी लोकेश राहुलने साकारली.  कुलदीप यादवने फखर झमान आणि बाबर आझमचे बळी मिळवत आपणही लयीत आल्याचे दाखवून दिले, ही भारतासाठी चांगली बाब म्हणावी लागेल,’’ असेही श्रीकांत यांनी सांगितले.