News Flash

टेनिसची नवी युवराज्ञी!

सेरेनाला पुन्हा एकदा विजेतेपदाने हुलकावणी दिली.

(संग्रहित छायाचित्र)

कॅनडाच्या बियांका आंद्रेस्कूची पहिल्या ग्रँडस्लॅम विजेतेपदावर मोहोर; २३ ग्रँडस्लॅम विजेत्या सेरेना विल्यम्सला पराभवाचा धक्का

प्रतिस्पर्धी खेळाडूला घरच्या चाहत्यांचा मिळणारा प्रचंड पाठिंबा, कारकीर्दीतील पहिलीच ग्रँडस्लॅम अंतिम फेरी आणि समोर सेरेना विल्यम्ससारखी अनुभवी प्रतिद्वंद्वी असतानाही कॅनडाची युवा टेनिसपटू बियांका आंद्रेस्कू डगमगली नाही. उलट यातून प्रेरणा घेत तिने रविवारी ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीतील अंतिम फेरीच्या सामन्यात बियांकाने सेरेनाला धूळ चारून कारकीर्दीतील पहिल्यावहिल्या ग्रँडस्लॅम विजेतेपदावर नाव कोरले.

आर्थर अ‍ॅश स्टेडियमवर एक तास आणि ४० मिनिटे रंगलेल्या या सामन्यात १९ वर्षीय बियांकाने ३७ वर्षीय आठव्या मानांकित सेरेनाला ६-३, ७-५ असे सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले. १५व्या मानांकित बियांकाचे हे कारकीर्दीतील एकूण तिसरे विजेतेपद असून यापूर्वी तिने एंडियन वेल्स आणि टोरंटो टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही ग्रँडस्लॅम स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद मिळवणारी ती कॅनडाची पहिली खेळाडू ठरली आहे. यापूर्वी २०१४ मध्ये एगुइन बॉचार्डने विम्बल्डनची अंतिम फेरी गाठली होती.

सेरेनाला मात्र पुन्हा एकदा विजेतेपदाने हुलकावणी दिली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या मार्गारेट कोर्ट यांच्या २४ ग्रँडस्लॅम विजेतेपदाची बरोबरी साधण्यासाठी सेरेनाला आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. गतवर्षीसुद्धा सेरेनाला अंतिम फेरीतच जपानच्या नाओमी ओसाकाविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता.

कारकीर्दीत पहिल्यांदाच अमेरिकन स्पर्धेच्या मुख्य फेरीची पात्रता मिळवणाऱ्या बियांकाने स्वप्नवत कामगिरी करून अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. अनुभवी सेरेनावर तिने पहिल्या सेटपासूनच वर्चस्व गाजवले. तिने फोरहँडच्या फटक्यांचा सुरेख वापर करून सेरेनाला एक-एक गुणासाठी संघर्ष करायला भाग पाडले. पहिला सेट ६-३ असा सहज जिंकल्यानंतर सेरेनाने जोरदार पुनरागमन करत

४-४ अशी बरोबरी साधली. परंतु बियांकाच्या जोशापुढे सेरेनाचा अनुभव कमी पडला. दुसऱ्या सेटमध्ये बियांकाने ७-५ अशी सरशी साधून विजयावर शिक्कामोर्तब केले. सेरेनाला नमवून जागतिक क्रमवारीतील अव्वल १० खेळाडूंविरुद्धची कामगिरी बियांकाने ८-० अशी उंचावली आहे.

तुम्हाला हे माहीत आहे का?

१ अवघ्या १९व्या वर्षी कोणत्याही ग्रँडस्लॅम स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद मिळवणारी आंद्रेस्कू (१९ वर्षे, ८४ दिवस) ही सर्वात युवा टेनिसपटू ठरली आहे. यापूर्वी मारिया शारापोव्हाने (१९ वर्षे, १३२ दिवस) २००६ मध्ये अमेरिकन स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते.

४ सेरेनाला गेल्या दोन वर्षांत चार विजेतेपदांनी हुलकावणी दिली. २०१८ आणि २०१९ची विम्बल्डन तसेच अमेरिकन या दोन्ही स्पर्धामध्ये तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

माझ्या भावना शब्दांत मांडणे फार कठीण आहे. माझे स्वप्न सत्यात उतरले आहे. कारकीर्दीत हा क्षण अनुभवण्यासाठी मी अथक परिश्रम केले. समोरील प्रतिस्पर्धी कोण आहे, याचा विचार न करता मी माझ्या खेळावरच लक्ष केंद्रित केल्यामुळे हे यश मिळवू शकले.

– बियांका आंद्रेस्कू

बियांकाने अविश्वसनीय खेळ केला. मी तिच्यासाठी यशासाठी फार आनंदी आहे. संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक खराब खेळ मी या लढतीत केला. त्यामुळेच मला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

– सेरेना विल्यम्स

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2019 1:54 am

Web Title: bianca andrescu canadas first grandslam winner abn 97
Next Stories
1 अमित पांघलवर भारताच्या जागतिक पदकाच्या आशा
2 भारताकडेही ग्रँडस्लॅम विजेते खेळाडू घडवण्याची क्षमता!
3 ‘अ‍ॅशेस’ ऑस्ट्रेलियाकडेच! इंग्लंडचा १८५ धावांनी धुव्वा
Just Now!
X