क्रिकेटच्या मैदानावर नवनवे विक्रम करणारा भारताचा कर्णधार विराट कोहली मैदानाबाहेरही विक्रम करण्यात मागे नसतो. फलंदाजी करताना धावांचा डोंगर उभारणारा विराट कोहली कमाईच्या बाबतीत देखील मागे नाही. ‘फोर्ब्स’च्या २०१८ रिपोर्टनुसार विराट कोहली हा सर्वात जास्त कमाई करणारा जगातील ८३ व्या तर भारतातील पहिल्या स्थानावरील खळाडू आहे. विराटने क्रिकेटमध्येच नाही तर कमाईच्या बाबतीतही सर्वांना मागे टाकले आहे.
फोर्ब्सने निवडलेल्या जगातील अव्वल १०० ऐथीलट्समध्ये विराट कोहली ८३ व्या स्थानावर आहे. या यादीत विराट कोहली एकमेव भारतीय खेळाडू आहे. सध्याच्या घडीला विराट कोहली जाहिरात क्षेत्रातील आघाडीची नाव आहे. गेल्या १२ महिन्यात विराट कोहलीची कमाई १७० कोटी रूपये आहे. विराट कोहली एकूण २१ कंपन्यासाठी जाहिरात करत आहे. घड्याळ, कार, स्पोर्ट्स शू, बाईक, कपडे, टायर्स, स्नॅक्स, हेल्थ फूड, हेडफोन आणि टूथब्रशसह अन्य कंपन्यांच्या जाहिरातीच्या माध्यमांतून विराट कोहली कोट्यवधी रूपयांची कमाई करतो.
विराट कोहली लवकरच एम.एस. धोनीचे वर्षभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूचा विक्रम मोडण्याची शक्यता आहे. माजी कर्णधार धोनीने २०१५ मध्ये अनेक कंपन्यांची जाहिरात केली होती. धोनीचे या काळात ३१० लाख कोटी (३१ मिलीयन डॉलर) रूपये वार्षिक उत्पन्न होते. कोहलीचे गेल्या १२ महिन्यातील कमाई २४ मिलीयन डॉलर आहे. सध्याची विराट कोहलीची कामगिरी आणि सोशल मीडियावर असणारे चाहते पाहता भविष्यात धोनीला मागे टाकण्याची शक्यता आहे. तरूण वर्गामध्ये विराट कोहलीच्या नावाची क्रेज आहे. युवा वर्ग विराट कोहलीच्या प्रत्येक गोष्टींकडे बारकाईने लक्ष देऊन असतो. त्यामुळे जाहिरात विश्वात विराट नावाचा एक ब्रँड तयार झाला आहे. गेल्यावर्षी विराट कोहलीने बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माशी लग्न केले. अनुष्काशी लग्न केल्यामुळे त्याची फॅमिली मॅन म्हणूनही वेगळी इमेज तयार झाली आहे. त्याचा त्याला कमाईमध्ये चांगलाच फायदा होत आहे. भविष्यामध्ये विराट कोहली धोनीला मागे टाकून आर्थिक कमाईमध्ये नवा विक्रम आपल्या नावावर करण्याची शक्यता आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 27, 2018 4:30 pm