ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी सिडनीत दाखल झालेल्या टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. दुखापतीमुळे आयपीएलच्या तेराव्या हंगामाला मुकलेला इशांत शर्मा कसोटी मालिकेआधी तंदुरुस्त होण्याचे संकेत मिळत आहेत. भारतीय संघाच्या निवडीदरम्यान रोहित शर्मा आणि इशांत शर्मा यांना त्यांच्या दुखापतीमुळे भारतीय संघात स्थान मिळालं नव्हतं. मात्र यानंतर रोहित शर्माचा कसोटी संघात समावेश करण्यात आला.

अवश्य वाचा – Video : उसळत्या चेंडूंचा सराव करण्यासाठी टीम इंडिया करतेय खास सराव

तर बीसीसीआयचे फिजीओ आणि NCA चे अधिकारी इशांतच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहेत. पारस म्हांब्रे आणि राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या इशांतने गेल्या काही दिवसांमध्ये चांगली प्रगती दाखवली आहे. त्यामुळे कसोटी मालिकेला सुरुवात होईपर्यंत इशांत तंदरुस्त होईल असा अंदाज NCA मधील सूत्रांनी ANI वृत्तसंस्थेशी बोलताना वर्तवला आहे.

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत इशांत शर्मासारख्या अनुभवी खेळाडूचं संघात असणं हे संघासाठी फायदेशीर ठरु शकतं असं मत NCA च्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं आहे. याच कारणामुळे बीसीसीआयने इशांत शर्माच्या दुखापतीचा अंदाज घेऊन त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघात जागा मिळण्याचा पर्याय खुला ठेवला होता. ९७ कसोटी सामन्यांमध्ये इशांतच्या नावावर २९७ बळी जमा आहेत.