दक्षिण अमेरिकेतील ब्राझीलमध्ये फुटबॉल विश्वचषकाचा महासोहळा सुरू झाला आहे. यजमान ब्राझीलने यानिमित्ताने जगभरातील विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांना सोहळ्याला निमंत्रित केले आहे. यामध्ये जागतिक महासत्तेचे अर्थात अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यापासून आपले नवनियुक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश आहे. ‘पृथ्वीतलावरील सर्वात सुंदर खेळ’ पाहायला आणि अनुभवायला या असे वरकरणी सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात राजकीय, आíथक आणि व्यापारी संबंध दृढ करण्याच्या दिशेने टाकलेली ही पावले आहेत.
मैदानावर खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी व्हीव्हीआयपी बॉक्समध्ये चक्क देशांचे राष्ट्रप्रमुख असावेत असा योगही विश्वचषकात जुळून येताना दिसतो आहे. फुटबॉलप्रेमी जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल जर्मनीच्या पोर्तुगालविरुद्धच्या सामन्याला संपूर्ण वेळ उपस्थित होत्या. प्रत्येक गोल झाल्यावर एखाद्या सामान्य प्रेक्षकाप्रमाणे त्या जल्लोष व्यक्त करत होत्या. जर्मनीच्या दणदणीत विजयानंतर त्यांनी संघासोबत आपल्या कॅमेऱ्यावर चक्क सेल्फीही टिपला.
ब्राझीलच्या अध्यक्षा दिलमा रौसेफ यांना भेटण्यासाठी अमेरिकेचे उपाध्यक्ष जो बिडेन दाखल झाले. फुटबॉलचे निमित्त दाखवायचे असल्याने त्यांनी अमेरिकेचा घानाविरुद्धचा सामना मन लावून पाहिला. मात्र त्यांचा ब्राझीलमध्ये येण्याचा उद्देश वेगळा आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थेने ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षा रौसेफ यांच्यावर पाळत ठेवल्याचे उघड झाले होते. यामुळे रौसेफ यांनी प्रस्तावित अमेरिकावारीही त्या वेळी रद्द केली होती. दक्षिण अमेरिकेतील महत्त्वपूर्ण देश हातातून निसटत असल्याने अमेरिकेला मैत्रीचा सेतू बांधणे भाग पडले आहे. या सेतूची पहिली वीट म्हणून बिडेन यांचे विमान ब्राझीलमधल्या नाताल शहरात उतरले. दुसरीकडे रौसेफ यांना व्यवहार्य कारणांसाठी अमेरिकेशी नाते जोडायचे आहे. ब्राझीलमध्ये ऑक्टोबर महिन्यात राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुका होणार आहेत. व्हेनेझुएला आणि क्युबासारख्या डाव्या विचारसरणीच्या देशांशी व्यापारी संबंध प्रस्थापित केल्याने रौसेफ प्रशासनावर विरोधकांनी टीकास्त्र सोडले आहे. अमेरिकेशी संधान जोडून हा विरोध शमवण्याचा रौसेफ यांचा हेतू आहे. चीननंतरचा अमेरिका हा ब्राझीलचा दुसरा मोठा व्यापारी मित्र आहे. रौसेफ यांच्यावरच पाळत ठेवण्याच्या प्रकारामुळे दोन्ही राष्ट्रांतले संबंध दुरावले. मात्र हे संबंध आर्थिकदृष्टय़ा दुरावणे ब्राझीलच्या हिताचे नसल्याचे रौसेफ यांना उमगले आहे. त्यामुळे मोठय़ा मनाने या दोस्ताला माफ करून मैत्रीचे नवे पर्व फुटबॉल विश्वचषकाच्या निमित्ताने सुरू होत आहे.
विश्वचषकाची अंतिम लढत म्हणजे फुटबॉल उत्सवाची जल्लोषी भैरवी. या मैफलीची अनुभूती घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट रौसेफ यांनी निमंत्रण धाडले आहे. मुत्सद्दी धोरणाचे प्रतीक म्हणून भूतानवारी यशस्वी करणारे मोदी महासोहळ्याच्या अंतिम मैफलीला हजर राहण्याची दाट शक्यता आहे. १३ जुलैला अंतिम मुकाबला रंगणार आहे, तर १५ ते १७ जुलै या काळात ब्रिक्स राष्ट्रांची परिषद ब्राझीलमधील फोर्टलेझा शहरात होणार आहे. ब्रिक्स राष्ट्रांपैकी झि जिनपिंग (चीनचे राष्ट्राध्यक्ष), व्लादिमीर पुतिन (रशियाचे राष्ट्राध्यक्ष) आणि जेकब झुमा (दक्षिण आफ्रिका) यांनी महामुकाबल्याला येण्याचे नक्की केले आहे. औपचारिक बैठकीपूर्वी खेळ पाहता पाहता या आपल्या दृष्टीने महत्त्वाच्या देशाच्या नेत्यांशी खलबते करण्याची ही नामी संधी आहे. याव्यतिरिक्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. सप्टेंबर महिन्यात मोदी अमेरिकावारी करणार असल्याची शक्यता आहे. त्याआधी जागतिक व्यासपीठावर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी सल्लामसलत करण्यासाठी फुटबॉल सुयोग्य कारण आहे. याशिवाय गेल्या दशकभरात इंडो-ब्राझील संबंध वेगवेगळ्या पातळ्यांवर विस्तारले आहेत. हे संबंध बळकट करण्याची आयती संधी मोदी यांना विश्वचषकाने दिली आहे.
अमेरिकेतल्या नैसर्गिक साधनसंपत्ती आणि व्यापारीदृष्टय़ाही महत्त्वाच्या देशांपैकी ब्राझील आहे. जागतिक पटलावर उदयास येणाऱ्या सत्तांमध्ये गणना होणाऱ्या ब्राझीलला आता मात्र बेरोजगारी, वीज, पाणी, वाहतूक अशा समस्यांनी ग्रासले आहे. विश्वचषकाच्या निमित्ताने हे प्रश्न तूर्तास बाजूला ठेवून आम्ही महासोहळ्याचे कसे आयोजन केले, हे शक्तिप्रदर्शन जगातल्या बडय़ा नेत्यांना दाखवण्यासाठी ब्राझील आतुर आहे. उणिवा, त्रुटी दूर करण्यासाठी उपस्थित राहणाऱ्या देशांच्या प्रमुखांनी मदतीचा हात पुढे केल्यास टाळी देण्यासाठी ब्राझील तय्यार आहे. फुटबॉलचा कुंभमेळा आटोपल्यानंतर दोनच वर्षांत ऑलिम्पिकचे शिवधनुष्य ब्राझीलला पेलायचे आहे. ते पेलण्यासाठी ‘बळ द्या’ हा संदेश जागतिक नेत्यांपर्यंत पोहोचवण्याचा ब्राझीलचा प्रयत्न असणार आहे. सोहळा खेळाचा असला तरी पडद्यामागे बरीच राजनीती सुरू आहे हे नक्की.

विश्वचषकाच्या निमित्ताने उपस्थित आंतरराष्ट्रीय राजनीतिज्ञ
* संयुक्त राष्ट्र महासंघाचे महासचिव बान की मून
* मोनॅकोचे प्रिन्स अल्बर्ट
* चिलीच्या राष्ट्राध्यक्षा मिचेल बॅचलेट,
* इक्वेडोरचे राष्ट्राध्यक्ष राफेल कोरिआ
* बोलिव्हिआचे अध्यक्ष इव्हो मोरालेस
* उरुग्वेचे अध्यक्ष जोस म्युजिका
* पेराग्वेचे अध्यक्ष होरासिओ कार्ट्स
* सुरिनामचे अध्यक्ष देसी बौटेर्स
* क्रोएशियाचे पंतप्रधान झोरान मिलानोव्हिक
* घानाचे राष्ट्राध्यक्ष जॉन द्रमानी महामा
* अंगोलाचे राष्ट्राध्यक्ष जोस इडय़ुडरे दोस सँटोस
* गाबोनचे राष्ट्राध्यक्ष अली बोंगो ओनडिम्बा
* कतारचे इमीर तमीम बिन हमाद अल थानी
* होंडुरासचे राष्ट्राध्यक्ष ज्युआन ओरलँडो हर्नाडिझ
*  केनियाचे राष्ट्राध्यक्ष उहूरू केनयट्टा