पैसा आणि प्रतिष्ठा या दोन्ही गोष्टींनी वलयांकित असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये (एमसीए) प्रवेश करण्यासाठी आता राज्यातील जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी ‘फिल्डिंग’ लावल्याचे चित्र समोर येत आहे. मंगळवारी एमसीएच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याची अंतिम तारीख होती. त्यामुळे एमसीएच्या संलग्न क्लबचे प्रतिनिधी म्हणून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) आमदार नितीन सरदेसाई हेसुद्धा नामनिर्देशन पत्र भरून सक्रिय झाले आहेत. यापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी), भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) आणि एमसीएचे अध्यक्षपद भूषवलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी निवडणूक लढवण्यासाठी उत्सुकता दाखवलेली आहे. सोमवारी काँग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही आपले नामनिर्देशन पत्र दाखल केल्यामुळे चव्हाण विरुद्ध पवार असा एमसीएच्या अध्यक्षपदासाठी सामना होणार अशा चर्चेला ऊत आला होता.
याशिवाय शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, राहुल शेवाळे, काँग्रेसचे नारायण राणे, भाजपचे आशिष शेलार ही नेतेमंडळीही निवडणुकीसाठी ‘पॅड’ बांधून बसलेली असल्याने
 ही निवडणूक फक्त क्रिकेटपुरतीच मर्यादित न राहता राजकीय आखाडा होणार, हे चित्र आताच स्पष्ट होते
आहे.
‘तुझे माझे जमेना आणि तुझ्यावाचून करमेना’ अशा अवस्थेत असलेले आणि एकमेकांशी शाब्दिक कुरघोडी करणारे पवार आणि चव्हाण हे एमसीएच्या निवडणुकीसाठी एकमेकांसमोर उभे राहणार असल्याचा बातम्या सोमवारी रंगल्या होत्या. त्यामध्येच भर म्हणून मंगळवारी गोपीनाथ मुंडे यांनी स्टायलो क्रिकेटर्स आणि नितीन सरदेसाई यांनी दादर पारसी झोरास्ट्रियन क्रिकेट क्लबकडून नामनिर्देशन पत्र भरल्याने प्रत्यक्ष निवडणुकीत कोण उभे राहणार याविषयीची उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र आणखी  बरेच राजकारणीही निवडणुकीसाठी सज्ज आहेत.
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी जवळपास वर्षभरापूर्वीच अनुक्रमे मेरी क्रिकेटर्स व यंग फ्रेंड्स युनियन क्लब प्रतिनिधित्व घेतले होते. निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी पहिले पाऊल वर्षभरापूर्वी टाकले असले तरी यंदा ते फक्त मतदाराचीच भूमिका बजावणार की उमेदवार म्हणून समोर येणार, हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे. शिवसेनेची ‘लॉबी’ मोठी करण्यासाठी त्यांना सुभाष देसाई (प्रबोधन) आणि राहुल शेवाळे (दादर क्रिकेट क्लब) यांचाही हातभार लागेल. पूर्वीश्रमीचे शिवसेनेचे नेते आणि सध्या काँग्रेसवासी असलेले नारायण राणे हे इलेव्हन सेव्हेंटीसेव्हन क्रिकेट क्लबचे सदस्य असून त्यांचा शिवसेनेला कडवा विरोध असेल.
शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याचे सूतोवाच केले होते. त्यांना विजय पाटील यांच्या ‘क्रिकेट फर्स्ट’ पॅनेलनेही पाठिंबा दर्शवला आहे. पण अध्यक्षपदासाठी अजून कुणीही दावा पेश केलेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चव्हाण आणि मुंडे हे राजकारणात विरोधात असले तरी पवारांना पाडण्यासाठी क्रिकेटच्या मैदानात एकत्र येण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे चव्हाण आणि मुंडे यांच्यापैकी एकच जण अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे.
राजकारणी                         क्रिकेट क्लब                    पक्ष
शरद पवार                    पारसी पायोनियर                राष्ट्रवादी काँग्रेस
जितेंद्र आव्हाड               मांडवी मुस्लीम्स                राष्ट्रवादी काँग्रेस
पृथ्वीराज चव्हाण            माझगाव क्रिकेट क्लब          काँग्रेस
गोपीनाथ मुंडे                स्टायलो क्रिकेटर्स                  भाजप
नारायण राणे                इलेव्हन सेव्हेंटीसेव्हन            काँग्रेस
उद्धव ठाकरे                 मेरी क्रिकेटर्स                           शिवसेना
आदित्य ठाकरे              यंग फ्रेंड्स युनियन                शिवसेना
आशिष शेलार              राजस्थान स्पोर्ट्स क्लब            भाजप
सुभाष देसाई               प्रबोधन                                  शिवसेना
नितीन सरदेसाई           दादर पारसी झोरास्ट्रियन            मनसे
राहुल शेवाळे               दादर क्रिकेट क्लब                शिवसेना