युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या जोडीने गेल्या वर्षभराच्या कालावधीत टीम इंडियामध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे. दोन्ही फिरकीपटूंनी धोनीच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कामगिरीतही सुधारणा केली आहे. धोनीच्या हाताखाली खेळणं ही आपल्यासाठी मोठी गोष्ट असल्याचं, चहलने मान्य केलं आहे. तो हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

“मला ज्यावेळी सल्ल्याची गरज भासते त्यावेळी मी सिनीअर खेळाडूंकडे जातो. विराट, धोनी, रोहित, शिखर हे सगळे माझ्या मोठ्या भावासारखे आहेत, आणि ते वेळोवेळी मला मदत करतात. ज्यावेळी विराट संघात नसतो त्यावेळी मी रोहितकडून सल्ला घेतो. मी आणि धोनी एकत्र ‘पब जी’ गेम खेळतो. जेवायला जाणं, व्हिडीओ गेम खेळणं अशा गोष्टी आम्ही सतत करत असतो. यासाठी धोनीचे आभार मानावे तितके कमी आहेत. तो माझा पहिला कर्णधार होता. ज्यावेळी मला आणि कुलदीपला मदतीची गरज असते त्यावेळी आम्ही धोनीशी चर्चा करतो.” चहलने धोनीचं कौतुक केलं.

चहल गेल्या काही दिवसांपासून बीसीसीआयसाठी ‘Chahal TV’ नावाचा कार्यक्रम करतोय. ज्यामध्ये सामना संपल्यानंतर त्याने रोहित शर्मा, शिखर धवन, मोहम्मद शमी, महेंद्रसिंह धोनी यांसारख्या खेळाडूंच्या मुलाखती घेतल्या आहेत. या कार्यक्रमाचा आपल्याला फायदा झाल्याचंही चहल म्हणाला. मे महिन्यात इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषकात चहलची जागा ही निश्चीत मानली जात आहे. त्यामुळे या स्पर्धेत चहल कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.