लॉकडाउन काळात आपल्या जखमी वडिलांना सायकलच्या मागच्या सीटवर बसवून गुरुग्राम ते बिहार हे १ हजार २०० किलोमीटरचं अंतर अवघ्या ६ दिवसांत गाठणाऱ्या ज्योती कुमारीची कहाणी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनीही ज्योतीच्या या जिद्दीची दखल घेतली, इतकच काय तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इव्हान्का ट्रम्प हिनेही ज्योतीच्या जिद्दीची कहाणी वाचत तिचं कौतुक केलं होतं. ज्योती कुमारीची कहाणी ऐकल्यानंतर सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने ज्योतीला चाचणीसाठी बोलावलं होतं. ज्योतीने Trials यशस्वीपणे पूर्ण केली, तर Nation Cycling Academy च्या कॉम्प्लेक्स मध्ये Trainee म्हणून तिची निवड होऊ शकते अशी माहितीही संघटनेच्या अध्यक्षांनी दिली होती. मात्र ज्योतीने हा प्रस्ताव नाकारला आहे.

मला माझं शिक्षण पूर्ण करायचं आहे. इतक्या लांब प्रवासानंतर मला थकायला झालेलं आहे. याआधी घरच्यांची परिस्थिती आणि घरकामं यामुळे मला शिक्षण पूर्ण करता आलेलं नाही. पण आता मला माझं दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करण्याला पहिलं प्राधान्य द्यायचं आहे.” द हिंदूला दिलेल्या मुलाखतीत ज्योती कुमारीने आपला मानस बोलून दाखवला.

Nation Cycling Academy ही ‘साई’च्या (Sports Authority of India) अत्याधुनिक सुविधेपैकी एक मानली जाते. आम्ही ज्योतीशी बोललो, लॉकडाउन संपल्यानंतर आम्ही तिला दिल्लीला बोलावलं आहे. तिच्या प्रवासाचा आणि राहण्याचा खर्च संघटनेतर्फे केला जाईल. तिला आपल्यासोबत कोणाला घेऊन यायचं असेल तरीही आम्ही त्याला परवानगी देऊ. आम्ही बिहारमधील आमच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात आहोत, आणि लॉकडाउन संपल्यानंतर तिला दिल्लीला चाचणीसाठी कसं पाठवता येईल याची चर्चा सुरु आहे. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष ओंकार सिंह यांनी ज्योतीच्या जिद्दीचं कौतुक केलं होतं.

ज्योतीचे वडील मोहन पासवान गुरुग्राममध्ये रिक्षा चालवत होते. लॉकडाउन काळात एका छोट्या अपघातात ते जखमी झाल्यामुळे त्यांचा रोजगार तुटला. यानंतर ज्योतीने सायकलवर आपल्या बाबांना पाठीमागे बसवत बिहार गाठण्याचा निर्णय घेतला. १० मे रोजी ज्योती आणि तिच्या वडिलांनी गुरुग्राम सोडलं यानंतर १६ मे रोजी ते बिहारमधील आपल्या गावी पोहचले.