11 December 2017

News Flash

बेधडक सचिन!

विश्वचषक २००३.. भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पध्र्यामध्ये थरारक लढत सुरू होती.. पाकिस्तानला विकेट्स

प्रसाद लाड - prasad.lad@expressindia.com | Updated: December 24, 2012 3:10 AM

विश्वचषक २००३.. भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पध्र्यामध्ये थरारक लढत सुरू होती.. पाकिस्तानला विकेट्स मिळत नव्हत्या, तेव्हा कर्णधार वसिम अक्रमने शोएब अख्तरच्या हाती चेंडू सोपवला.. त्यालाही विकेट मिळत नव्हत्या, त्याने मग अडखळत खेळणाऱ्या सेहवागला ‘मेरे ओव्हर में मारके दिखा’ अशी दोन-तीनदा हुल दिली.. सेहवाग त्यानंतर त्याला फक्त ‘वो सामने तेरा बाप खडा है, उसको ऐसे बोल’ एवढेच सांगितल़े.. शोएबने ती घोडचूक केली आणि सेहवागचे बोल खरे ठरले. कारण सचिनने आपल्या बॅटने बेधडकपणे शोएबच्या गोलंदाजीला उत्तर दिले आणि त्याचा बोऱ्या वाजवला. सचिन रमेश तेंडुलकर ही अकरा अक्षरे प्रतिस्पध्र्याना ११ खेळाडूंसारखी वाटायची, एवढा दरारा सचिनचा होता. सचिनशिवाय आपण जिंकूच शकत नाही, अशी परिस्थिती एकेकाळी भारताची होती. कारण सचिन धावांच्या राशी उभारायचा आणि भारताच्या ललाटावर विजयाचा तिलक लावायचा. त्याचे प्रत्येक शतक राष्ट्रीय सणासारखे देशात साजरे केले जायचे. त्याने या धावांचा महामेरू एवढय़ा उंचीवर नेला की, आता तिथपर्यंत पोहोचणे कोणाला शक्य होईल, असे सध्या तरी दिसत नाही.
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हटले जाते, पण सचिन तेंडुलकर जेव्हा कारकिर्दीतील पहिल्याच सामन्यात शून्यावर बाद झाला तेव्हा तो पोऱ्या जगविख्यात क्रिकेटपटू होईल, असे कोणाच्याही गावी नव्हते. धावांचा तो नेहमीच भुकेला होता, पण तो कधीच विक्रमांच्या मागे लागला नाही, तर विश्वविक्रमांनी माळ आपसूकच अलवारपणे त्याच्या गळ्यात टाकली. ‘मी खेळत गेलो आणि विश्वविक्रम होत गेले,’ असं निर्लेपपणे सचिन म्हणतो.
एकदिवसीय सामन्यातले पहिले शतक झळकावायला त्याला जवळपास चार वर्षे लागली. कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर मनोज प्रभाकरच्या साथीने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर तुटून पडत सचिनने पहिले एकदिवसीय शतक झळकावले. त्यानंतर सचिन प्रकाशझोतात आला तो १९९८ साली, कारण या एका वर्षांत तब्बल नऊ शतके लगावत त्याने १८९४ धावा फटकावल्या, त्याचा हा विश्वविक्रम अजूनही कोणाला मोडता आलेला नाही. त्यानंतर १९९९ साली राहुल द्रविडबरोबर दुसऱ्या विकेटसाठी ३३१ धावांची भागीदारी रचत त्याने अजून एका विश्वविक्रमाला गवसणी घातली. २००१ साली त्याने कारकिर्दीतल्या दहा हजार धावांचा टप्पा गाठला, तर त्यानंतर २००७ मध्ये त्याने पंधरा हजारांचा टप्पा गाठत अजून एका विश्वविक्रमाचा तुरा आपल्या शिरपेचात खोवला. यापूर्वीच त्याने १७ शतकांचा डेसमंड हेन्सचा विक्रम मोडीत काढत तो नवा विश्वविक्रम रचला आणि तो अबाधित राखला. २४ फेब्रुवारी २०१०, हा दिवस सचिनने क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला. कारण या दिवशी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना पहिले द्विशतक झळकावण्याचा मान त्याने पटकावला.
पाच विश्वचषक खेळुनही त्याने विश्वविजयाची चव चाखली नव्हती, पण गेल्याच वर्षी भारताने विश्वचषकाला गवसणी घातली आणि त्याचे हे स्वप्नही पूर्ण झाले. विश्वचषकानंतर मात्र सचिनकडून धावा आटल्या, प्रत्येक सामन्यात त्याच्याकडून शतकाची अपेक्षा होती, कारण होणारे शतक होते शंभरावे. तब्बल एक वर्ष आणि पाच दिवसांनी मीरपूरला बांगलादेशविरुद्ध खेळताना सचिनने शतकाला गवसणी घालत कारकीर्दीतले शंभरावे आणि एकदिवसीय कारकीर्दीतले ४९वे शतक साजरे केले.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदा २०० धावा पुष्कळ वाटायच्या, पण २०० धावा करणारा क्रिकेट जगतातला पहिला खेळाडू होण्याचा मान सचिनने पटकावला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने (४६३), सर्वाधिक धावा (१८४२६), सर्वाधिक शतके (४९), सर्वाधिक अर्धशतके (९६), सर्वाधिक चौकार (२०१६) हे जवळपास सारे फलंदाजीचे विश्वविक्रम त्याच्या नावावर आहेत. एका वर्षांत सर्वाधिक धावा काढण्याचा त्याचा विश्वविक्रम अजूनही अबाधित आहे, १९९८ साली १८९४ धावा सचिनने फटकावल्या होत्या, त्यामध्ये नऊ शतकांचा समावेश होता. एका वर्षांत नऊ शतके ठोकणारा सचिन एकमेव फलंदाज आहे. एका देशाविरुद्ध सर्वाधिक शतके करण्याचा मानही सचिनकडेच असून त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नऊ शतके लगावली आहेत.
विश्वविक्रमाचे मैलाचे दगड तो एका मागोमाग एक पार करत गेला आणि क्रिकेटविश्वाला अनंत स्वर्गीय आनंदाचे क्षण त्याने दिले. अनेक अविस्मरणीय, अद्भुत, अप्रतिम, अचाट खेळी त्याने साकारल्या आणि विश्वविक्रम रचण्यासाठीच आपला जन्म झाल्याचे त्याने दाखवून दिले. सचिनच्या निवृत्तीची बातमी चटका लावणारी, हेलावून टाकणारी आहे. कारण ज्या सचिनने एक पिढी घडवली, तो यानंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये दिसणार नाही, हे समजूनही न पटण्यासारखेच. एकेकाळी विजयपथावरून संघाला नेणारा सचिन गजराज वाटायचा, पण आता काहींना तो पांढरा हत्ती वाटू लागला होता. २०१५चा विश्वचषक लक्षात घेता संघबांधणीसाठी त्याने हा निर्णय घेतला. मैदानात अप्रतिम ‘टायमिंग’च्या जोरावर शैलीदार नजाकतभरे फटके मारणाऱ्या सचिनचे निवृत्तीचे ‘टायमिंग’ मात्र चुकले, ही खंत काही जणांच्या मनात नक्कीच आहे.   

First Published on December 24, 2012 3:10 am

Web Title: bindaas sachin
टॅग Sachin Tendulkar