‘‘ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी अव्वल दर्जाची होण्यासाठी उद्योग क्षेत्राकडून खेळाडूंना वाढीव सहकार्य मिळाले पाहिजे. विविध खेळांच्या संघटनांकडे अतिशय मर्यादित आर्थिक पाठबळ असते. कंपन्यांनी त्यांच्या सामाजिक कार्याच्या निधीतून खेळासाठी साहाय्य केले, तर निश्चितच आपल्या देशातील क्रीडा क्षेत्राचा दर्जा उंचावण्यास मदत होईल,’’ असे ऑलिम्पिक नेमबाज अभिनव बिंद्रा याने सांगितले.
नेमबाजीत भारतीय खेळाडूंनी केलेल्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करीत बिंद्रा म्हणाला, ‘‘या खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळविण्याची क्षमता असलेले भरपूर नैपुण्य आपल्याकडे आहे. या खेळाच्या स्पर्धामध्ये गुणात्मक व संख्यात्मक वाढता सहभाग असतो. राष्ट्रीय स्पर्धा व निवड चाचणी स्पर्धा अतिशय चुरशीने खेळल्या जात आहेत. शासनाने ऑलिम्पिक पदक व्यासपीठ ही योजना सुरू करीत खेळाडूंचा उत्साह वाढविला आहे. पूर्वी खेळाडूंना मदतीसाठी अर्ज करावे लागत असत. आता विनाविलंब त्यांना आर्थिक पाठबळ मिळत आहे. सध्या ऑलिम्पिक पात्रतेवर मी लक्ष केंद्रित करीत आहे. पात्रता स्पर्धेत सर्वोच्च कामगिरी करण्याचे माझे ध्येय असून, त्याकरिता मी कसून सराव करीत आहे.’’
लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळविणाऱ्या गगन नारंग याने सांगितले, ‘‘पात्रता स्पर्धेत चांगले यश मिळविण्यासाठी मी वजन कमी केले असून तंदुरुस्तीवर अधिक लक्ष देत आहे. सरावाबरोबरच स्पर्धामधील सहभागही महत्त्वाचा असतो. तेथील अनुभव नेहमीच उपयोगी पडत असतो. मी प्रोन व थ्री पोझिशन या प्रकारांवर विशेष लक्ष देत आहे. तसेच दहा मीटर एअर रायफलमध्येही पदक मिळविण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे.’’