प्रशांत केणी

रोहित शर्मा, ऋषभ पंत, शुभमन गिल, नवदीप सैनी आणि पृथ्वी शॉ या पाच क्रिकेटपटूंनी जैव-सुरक्षेचे उल्लंघन केल्यामुळे भारत-ऑस्ट्रेलिया मालिका १-१ अशी रंगतदार अवस्थेत आल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडली. सध्या या प्रकरणी चौकशी सुरू असून, यापैकी चार क्रिकेटपटू हे सिडनी कसोटीत खेळत आहेत. पाच क्रिकेटपटूंकडून जाणते-अजाणतेपणे उल्लंघन झाल्याचे सिद्ध झाल्यास कारवाईचे सोपस्कार ही पुढील आव्हाने, परंतु या घटनेनंतर जैव-सुरक्षेच्या काटेरी कुंपणाच्या अपरिहार्यतेविषयीची चर्चा पुन्हा ऐरणीवर आली आहे.

गतवर्षी करोनाच्या साथीमुळे सर्व देशांमध्ये टाळेबंदीची स्थिती असताना बंदिस्त स्टेडियममध्ये प्रेक्षकांविना सामने घेता यावेत आणि हे सामने खेळणारे खेळाडू करोनामुक्त असावेत, यासाठीच जैव-सुरक्षित वातावरणाची रचना करण्यात आली. कोणत्याही स्पर्धा किंवा मालिकेपूर्वी खेळाडू, मार्गदर्शकांची करोना चाचणी नकारात्मक आल्यानंतर विलगीकरण आणि निवासाच्या हॉटेलमध्येही निर्बंधित वातावरण हे त्याचे वैशिष्टय़. या वातावरणात कुटुंब, मित्र-परिवाराला भेटण्यास प्रतिबंध आहे.

जुलै २०२० मध्ये इंग्लंड-वेस्ट इंडिज मालिकेने आंतरराष्ट्रीय क्रिकेट पूर्वपदावर आले, पण जैव-सुरक्षित वातावरणात क्रिकेट हे या मालिकेने रूढ केले; पण याचा पहिला फटका यजमान इंग्लंडलाच बसला. जैव-सुरक्षेच्या शिष्टाचारांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जोफ्रा आर्चरला संघातून वगळण्यात आले. पाच दिवसांचे विलगीकरण, दंड आणि ताकीद अशी शिक्षा आर्चरला भोगावी लागली. मग गतवर्षी ऑगस्ट महिन्यात इंग्लंड दौऱ्यावरील पाकिस्तानच्या मोहम्मद हाफीझला जैव-सुरक्षेच्या नियमाचा भंग केल्याप्रकरणी पाच दिवसांच्या विलगीकरणाची शिक्षा सुनावण्यात आली. त्याने एका ९० वर्षीय वृद्ध महिलेची भेट घेऊन तिच्या आरोग्यमय आणि आनंदी जीवनाविषयक प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर पोस्ट केली. त्यानंतर नोव्हेंबर २०२० मध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानच्या संघातील सहा सदस्यांना करोनाची लागण झाली. या सहा जणांनी करोनाच्या आणि जैव-सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे न्यूझीलंड क्रिकेट मंडळ आणि तेथील सरकारकडून पाकिस्तानच्या संघाला गंभीर ताकीद देण्यात आली. पुन्हा असे कृत्य घडल्यास मालिका स्थगित करून पाकिस्तानच्या संघाला मायदेशी परत पाठवण्यात येईल, असा इशारा त्यांना देण्यात आला.

जैव-सुरक्षित वातावरणामुळे क्रिकेटपटूंच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम झाल्याचे मांडत अनेक मातब्बर क्रिकेटपटू आणि कर्णधारांनी जैव-सुरक्षित वातावरणाबाबत ताशेरे ओढले आहेत. जैव-सुरक्षित वातावरण म्हणजे पंचतारांकित तुरुंग. जिथे कुणालाही तक्रारीला वाव नाही, असे भाष्य करण्याचे धारिष्टय़ माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने दाखवले होते. जैव-सुरक्षित वातावरण मानसिक थकवा आणणारे आहे. दीर्घकालीन स्पर्धा किंवा मालिका असेल, तर त्याचे गांभीर्य अधिक लक्षात येते, असे भारताचा कर्णधार विराट कोहलीने म्हटले होते. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज टॉम करन म्हणतो की, तुम्ही तिन्ही प्रकारचे क्रिकेट खेळत असाल तर लागोपाठचे जैव-सुरक्षेचे आव्हान खडतर आहे, कारण कुटुंब किंवा आवडत्या व्यक्तींसोबत वेळ घालवायला संधीच मिळत नाही. खेळाडूंना यापुढे स्पर्धा किंवा मालिकांची निवड करण्याशिवाय पर्याय नसेल! क्रिकेटपटूंच्या मानसिक आरोग्यावर जैव-सुरक्षित वातावरणाचा परिणाम होत असेल, तर त्यातून बाहेर पडणेच इष्ट ठरेल, असा निर्वाणीचा सल्ला इंग्लंडचा मर्यादित षटकांचा कर्णधार ईऑन मॉर्गनने दिला आहे. भारताचा सलामीवीर शिखर धवनने जैव-सुरक्षित वातावरण हे बिग बॉसच्या घरासारखेच असल्याचे म्हटले होते. ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांनी जैव-सुरक्षित वातावरणाचा तिटकारा आल्यामुळे चक्क बिग बॅश लीगमधूनच माघार घेतली आहे; परंतु जैव-सुरक्षेच्या उल्लंघनाचे समर्थन करण्याची मुळीच आवश्यकता नाही. एकीकडे लशीचे संशोधन अंतिम टप्प्यात असताना करोना विषाणू संसर्गाची साथ जगभरात अद्यापही पसरते आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठीचे हे सुरक्षित वातावरण क्रिकेटनेच नव्हे, तर जवळपास सर्वच क्रीडा प्रकारांनी स्वीकारले आहे. जैव-सुरक्षेच्या वातावरणानिशी सामने खेळता येतात, हे फुटबॉलने सर्वप्रथम जगाला दाखवून दिले. सध्या युरोपात नव्या करोनामुळे रुग्णसंख्या वेगाने वाढत असतानाही तेथील क्रीडा प्रकार मात्र जैव-सुरक्षित वातावरणात अविरत सुरू आहेत. बाहेरील जगापासून संपर्क तुटणे, हे मानसिक आणि आरोग्याच्या दृष्टीने खच्चीकरण असल्याचे खेळाडूंना वाटत असले तरी सद्य:स्थितीत हे अपरिहार्य आहे.

prashant.keni@expressindia.com