युवा हार्दिक पांड्यानं भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडूची मोठी पोकळी भरुन काढली. सध्याच्या घडीला पांड्या भारतीय संघाचा अविभाज्य घटक आहे. श्रीलंकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर टी-२०, एकदिवसीय आणि कसोटी या तीन प्रकारांत त्यानं आपली पात्रता सिद्ध केली. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत त्याने कसोटी कारकिर्दीतील पहिलं वहिलं शतक साजरे केले. एकदिवसीय सामन्यातील धडाकेबाज खेळीनं पांड्यानं अनेक सामन्यात भारताला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. याच खेळीनं त्यानं अनेक क्रिकेट चाहत्यांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली.

पांड्या म्हणजे उत्तुंग फटकेबाजीनं सामन्याचं चित्र बदलणारा जादूगार आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यानं केलेल्या तीन षटकारांच्या हॅटट्रिकमुळे एकदिवसीय क्रिकेटमधील पहिल्या शतकापेक्षा तो एका षटकात सहा षटकार कधी मारणार याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते. चाहत्यांशिवाय पांड्याच्या वडिलांनी देखील ही इच्छा व्यक्त केली आहे. क्रिकेटच्या मैदानात पांड्या सहजपणे खेळताना दिसत असला तरी त्यांचा प्रवास फारच खडतर असा होता. आर्थिक परिस्थिती हालाखीची असताना पांड्यानं क्रिकेटच्या मैदानात पाऊल ठेवले अन् आजच्या घडीला तो फारच कमी कालावधीत यशाच्या शिखरावर पोहोचला. २०१५ मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघात वर्णी लागल्यानंतर पांड्याची दिशा बदलली. फिरकी गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरणाऱ्या पांड्याला स्वत: लेग स्पिनर व्हायचे होते. मात्र प्रशिक्षक किरण मोरे यांच्या सल्ल्यानंतर त्याने मध्यमगती गोलंदाजीवर भर दिला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या ताकदीच्या जोरावर सामना फिरवण्याची धमक असणाऱ्या पांड्याला देशांतर्गत क्रिकेटच्या मैदानात दुसऱ्याचे बॅटने खेळावे लागले होते. २०१४ साली विजय हजारे करंडक स्पर्धेत पांड्या भारतीय संघाचा एकेकाळचा हुकमी एक्का असणाऱ्या इरफानच्या बँटने खेळला होता. इरफाननेही त्याला हसत मुखाने मदत केली.  हार्दिक पांड्याने २६ जानेवारी २०१६ मध्ये टी-२० तून भारतीय संघात पदार्पण केले. धोनीच्या नेतृत्वाखाली अॅडलेडच्या मैदानातील पहिल्या सामन्यात पांड्याची चांगलीच धुलाई झाली. पांड्याने कारकिर्दीतील पहिले षटक हे ११ चेंडूचे टाकले. यात त्याने पाच वाईड चेंडूसह १९ धावा दिल्या. पदार्पणाच्या सामन्यात पहिल्या षटकात सर्वाधिक धावा देण्याचा या खराब विक्रमानंतर आज पांड्या उत्तुंग फटकेबाजीसह गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील चपळाईमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. षटकाराने चाहत्यांचा आनंद द्विगुणित करणाऱ्या पांड्यानं लवकरच एका षटकारात सहा षटकारांची आतषबाजी करावी, हिच शुभेच्छा!