नवी दिल्ली : फिरोजशाह कोटला स्टेडियममधील प्रेक्षागृहाला दिलेले आपले नाव तात्काळ काढून टाकण्यात यावे, अन्यथा दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनविरुद्ध (डीडीसीए) कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा भारताचे महान फिरकीपटू बिशन सिंग बेदी यांनी दिला आहे.

बेदी यांनी बुधवारी ‘डीडीसीए’ला पत्र पाठवून कोटला स्टेडियमवर माजी अध्यक्ष अरुण जेटली यांचा पुतळा बसवण्याविषयी कडाडून टीका केली होती. ‘डीडीसीए’कडून यावर कोणतेही प्रत्युत्तर न मिळाल्यामुळे संतापलेल्या बेदी यांनी शनिवारी आणखी एक पत्र लिहून थेट कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

‘‘काही दिवसांपूर्वी मी तुम्हाला पत्र लिहिले होते. हे पत्र तुमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर जगभरातील क्रिकेटक्षेत्रातून मला अभूतपूर्व पाठिंबा मिळाला. मात्र तुमच्याकडून कोणतेही प्रत्युत्तर मला मिळाले नाही, हे खेदजनक आहे,’’ असे बेदी यांनी ‘डीडीसीए’चे अध्यक्ष रोहन जेटली यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

‘‘भारतासारख्या देशात आपले नाव कुठे झळकावे आणि त्याचे पावित्र्य राखले जात आहे की नाही, हे ठरवण्याचा अधिकार त्या व्यक्तिला नक्कीच असतो. माझ्या पत्राला प्रत्युत्तर न देणाऱ्या रोहन जेटली यांची भूमिका अयोग्य आणि चुकीची आहे,’’ असे बेदी म्हणाले.

येत्या सोमवारी अरुण जेटली यांच्या पुतळ्याचे अनावरण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि ‘बीसीसीआय’चे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे.