संघटनात्मक स्तरावरील मतभेद बाजूला ठेवून ‘एक खेळ, एक संघटना’ हे तत्त्व कटाक्षाने अमलात आणले पाहिजे, तरच जिम्नॅस्टिक्समध्ये ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न भारतीय खेळाडू साकार करू शकतील, असे मत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विश्वेश्वर नंदी यांनी व्यक्त केले.

‘‘जिम्नॅस्टिक्ससारख्या विलोभनीय क्रीडा प्रकारात आपले खेळाडू ऑलिम्पिक पदकाच्या उंबरठय़ापर्यंत पोहोचू शकत आहेत. जागतिक स्पर्धेतही पदक मिळवू लागले आहेत, मात्र तरीही या खेळाने अपेक्षेइतकी प्रगतीची कास धरलेली नाही. या खेळाचा विकास साधण्यासाठी खेळाडू, प्रशिक्षक, संघटक, पालक व शासन यांनी सामूहिक प्रयत्न केले पाहिजेत,’’ असे नंदी यांनी सांगितले.

नंदी यांच्याकडूनच या खेळाचे बाळकडू घेतलेल्या अरुणा रेड्डीने नुकत्याच झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली. हे पदक मिळवणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू आहे. नंदी यांची शिष्या दीपा कर्माकरला रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदकाच्या उंबरठय़ावरून हार मानावी लागली होती. गेल्या तीन-चार वर्षांमध्ये भारतीय जिम्नॅस्टिकपटू चांगले यश मिळवू लागले आहेत. त्याबाबत नंदी यांच्याशी केलेली खास बातचीत-

अरुणाच्या जागतिक पदकाबाबत काय सांगता येईल?

खरोखरीच देशास अभिमानास्पद अशी तिची कामगिरी आहे. तिचे रौप्यपदक थोडक्यात हुकले, तरीही तिची कामगिरी खूपच प्रेरणादायी आहे. कारण जागतिक स्तरावर चीन, दक्षिण कोरिया, जपान आदी अनेक  देशांच्या खेळाडूंचे वर्चस्व असते. या पाश्र्वभूमीवर तिने दाखविलेला आत्मविश्वास, चिकाटी व जिद्द याचेच हे यश आहे. भारतीय खेळाडू जागतिक पदकापर्यंत पोहोचू शकतात, हे तिने दाखवून दिले आहे. खरे तर कराटे या खेळातच तिला कारकीर्द घडवायची होती. वडिलांच्या इच्छेखातर तिने माझ्याकडे जिम्नॅस्टिक्सचा सराव सुरू केला. त्याच वेळी या खेळाडूकडे जागतिक स्तरावर चमक दाखवण्याची क्षमता आहे याची मला जाणीव झाली होती. माझ्याकडून प्राथमिक प्रशिक्षण घेतल्यानंतर ती स्वतंत्र प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.

राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये अरुणाकडून काय अपेक्षा आहेत?

जागतिक स्पर्धेतील यशस्वी कामगिरीमुळे अरुणाचा आत्मविश्वास उंचावला आहे. तेथील अनुभवाचा फायदा तिला मिळणार आहे. या दोन्ही स्पर्धामध्ये तिला तुल्यबळ लढत द्यावी लागणार आहे, तरीही तिच्याकडे असलेले नैपुण्य व जिद्द लक्षात घेता तिच्याकडून पदकाची अपेक्षा आहे.

ऑलिम्पिकमध्ये आपल्याला पदकाच्या कितपत संधी आहेत?

ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेबाबत अंदाज बांधणे कठीण असते, तरीही अरुणा व दीपा यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. आशियाई स्पर्धेपर्यंत दीपा शंभर टक्के तंदुरुस्त होईल. आगामी ऑलिम्पिकपर्यंत अजून दोन वर्षांचा कालावधी बाकी आहे. तोपर्यंत संभाव्य पदक विजेत्या खेळाडूंकरिता परदेशातील स्पर्धा व सराव शिबिरांमधील सहभाग यावर भर देण्याची गरज आहे. प्रशिक्षक म्हणून आम्ही शंभर टक्के त्यांच्याकडून मेहनत करून घेत असतो. प्रत्यक्ष स्पर्धेच्या वेळी कशी कामगिरी होते ते महत्त्वाचे असते.

प्रशिक्षकांकरिता परदेशी प्रशिक्षणाची गरज आहे काय?

होय, सतत प्रशिक्षणाच्या पद्धतीत नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असते. भारतीय क्रीडा प्राधिकरण व केंद्र शासनाकडून खूप चांगली मदत मिळत असते, तरीही प्रशिक्षकांकरिता प्रशिक्षण शिबीर आयोजित केले तर आपोआपच त्यांचा दर्जा उंचावण्यास मदत मिळेल. जिम्नॅस्टिक्सकरिता नैपुण्य आहे, मात्र प्रशिक्षकांची कमतरता आहे. त्यामुळेच उत्तम दर्जाचे प्रशिक्षक घडवण्याची आवश्यकता आहे.

क्रीडा सुविधा पुरेशा आहेत काय?

दीपाने ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठल्यामुळे या खेळात मुलींचा सहभाग वाढला आहे. मात्र खेळाडूंना अव्वल दर्जाच्या क्रीडा सुविधा देण्याची गरज आहे. देशाच्या महत्त्वाच्या शहरांमध्ये जिम्नॅस्टिक्स अकादमी स्थापन केल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे अधिकाधिक स्पर्धाची गरज आहे. जर खेळाडूंना स्पर्धामध्ये संधी मिळाली तर आपोआपच त्यांचे पालक सहकार्य करतात. संघटनात्मक स्तरावरील मतभेद बाजूला ठेवत उपकनिष्ठ, कुमार व वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धा वेळेवर घेतल्या जातील असे कटाक्षाने पाहण्याची गरज आहे. त्याकरिता शासनाने प्रयत्न केले पाहिजेत. सुदैवाने केंद्रीय क्रीडा खाते हे राजवर्धनसिंह राठोड या ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या नेमबाजांकडे आहे. ऑलिम्पिक पदकापर्यंत पोहोचण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते, याचा त्यांच्याकडे पुरेसा अभ्यास आहे. त्यांनी संघटनात्मक समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.