तब्बल ४ महिन्यांच्या कालावधीनंतर बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली आहे. इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात साऊदम्पटनच्या मैदानात कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवसातला बहुतांश खेळ पावसामुळे वाया गेला असला तरीही इंग्लंड आणि वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी सामना सुरु होण्याआधी वर्णद्वेषाविरोधात आवाज उठवला. काही दिवसांपूर्वी अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय इसमाला पोलीस कस्टडीत असताना आपला प्राण गमवावा लागला होता.

या घटनेनंतर अमेरिकेत कृष्णवर्णीय बांधव रस्त्यावर उतरले होते. वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनीही या घटनेविरोधात आवाज उठवत खेळामध्येही वर्णद्वेष होत असल्याचं सांगितलं होतं. ख्रिस गेल, डॅरेन सॅमी या विंडीजच्या खेळाडूंनी आपल्याला वर्णद्वेषाचा सामना करावा लागल्याचं सांगितलं. विंडीज-इंग्लंडचे खेळाडू आणि पंचांनी सामना सुरु होण्याआधी मैदानात एका गुडघ्यावर बसून एक हात उंच करत वर्णद्वेषाला विरोध दर्शवला.

दरम्यान, पावसामुळे सामना सुरु होण्यास विलंब झाला. यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विंडीजने धडाकेबाज सुरुवात करत इंग्लंडला पहिला धक्का दिला. शेनॉन गॅब्रिअलने इंग्लंडच्या डोम सिबलीला भोपळाही न फोडू देता माघारी धाडलं. यानंतर रोरी बर्न्स आणि जो डेनली या फलंदाजांनी बाजू सावरत इंग्लंडला १ बाद ३५ अशी मजल मारुन दिली. यानंतर पावसामुळे पुन्हा एकदा सामना थांबवण्यात आला.