इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शतक हुकल्यापेक्षा संघाच्या विजयापर्यंत खेळपट्टीवर न टिकल्याची मला खंत आहे, असे वेस्ट इंडिजचा फलंदाज जेर्मिन ब्लॅकवूडने सांगितले.

२८ वर्षीय ब्लॅकवूडने दुसऱ्या डावात साकारलेल्या ९५ धावांच्या झुंजार खेळीमुळे विंडीजने इंग्लंडवर चार गडी राखून ऐतिहासिक विजय मिळवला. ‘‘मी जेव्हा बाद झालो, त्यावेळी संघाला विजयासाठी अवघ्या ११ धावांची आवश्यकता होती. माझ्या बाद होण्याने सामन्याला कलाटणी मिळाली असती तर मी स्वत:ला कधीच माफ केले नसते. त्यामुळे संघाच्या विजयापूर्वीच बाद झाल्याने मी निराश झालो,’’ असे ब्लॅकवूड म्हणाला.

‘‘जेसन होल्डर आणि मी कुमार वयोगटापासून एकत्र खेळलो आहोत. दुसऱ्या डावात ३ बाद २७ धावांवर फलंदाजीला उतरताना मी दडपणाखाली होतो. परंतु होल्डरने मला सुरुवातीची १५-२० मिनिटे खेळपट्टीवर स्थिरावण्याचे सुचवले. त्यानंतर मी नैसर्गिक खेळाला प्रारंभ केला,’’ असे ब्लॅकवूडने सांगितले.

‘आयसीसी’ क्रमवारीत होल्डर दुसऱ्या स्थानी

वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरने ‘आयसीसी’ कसोटी क्र मवारीतील गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर मजल मारली. गेल्या २० वर्षांत ‘आयसीसी’ क्रमवारीत सर्वाधिक गुण मिळवणारा तो विंडीजचा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. होल्डरने कसोटीच्या पहिल्या डावात सहा आणि दुसऱ्या डावात एक बळी मिळवला. ब्लॅकवूडने फलंदाजांच्या क्रमवारीत १४ स्थानांनी झेप घेत ५८वे स्थान मिळवले आहे.