भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार आणि मराठमोळा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेवर यंदाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मोठी जबाबदारी असणार आहे. अॅडलेड कसोटी सामन्यानंतर कर्णधार विराट कोहली पत्नी अनुष्काची काळजी घेण्यासाठी भारतात परतणार आहे. विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे भारताचं नेतृत्व करेल. मध्यंतरी काही माजी खेळाडूंनी विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्यवर दडपण असेल असं म्हटलं होतं. परंतू माजी फलंदाज सचिन तेंडुलकरच्या मते अजिंक्य रहाणे चतूर आहे, त्यामुळे तो भारताचं चांगल्या पद्धतीने नेतृत्व करेल.

“विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्य भारताचं नेतृत्व करताना पाहणं इंटरेस्टिंग असेल. मी याआधी त्याच्याशी बोललो आहे, तो अतिशय संतुलती आहे आणि चतूरही आहे. त्याच्यात आक्रमकता असली तरीही ती कुठे दाखवायची हे त्याला माहिती आहे. मी ज्या-ज्या वेळी त्याच्यासोबत वेळ घालवला आहे, त्यावेळी तो प्रचंड मेहनती आहे हे मला नेहमी जाणवलं आहे. तो कोणतीही गोष्ट गृहीत धरत नाही. तुम्ही मेहनती असाल तर तुमच्यासोबत चांगल्या गोष्टी या घडतातच. त्यामुळे अजिंक्य विराटच्या अनुपस्थितीत भारताचं चांगल्या पद्धतीने नेतृत्व करेल अशी मला खात्री आहे.” Sports Today या यु-ट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सचिन बोलत होता.

दरम्यान पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर विराट कोहली भारतात परतणार आहे. पत्नी अनुष्काची बाळंतपणात काळजी घेण्यासाठी विराटला बीसीसीआयने विशेष सुट्टी मंजूर केली आहे.

अवश्य वाचा –  ये नया इंडिया है ! पहिल्या कसोटीआधी आक्रमक शैलीबद्दल विराटचं वक्तव्य