नेत्रविकारावर मात करून १२ हजार छायाचित्रे,

कात्रणांचा खजिना जमविला
सचिन तेंडुलकर या नावाने गेली अनेक वष्रे क्रिकेटरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. सचिन नामाचा हाच ठसा कांदिवलीच्या चिराग जोशी या २६ वर्षीय तरुणावरसुद्धा बालपणीपासून उमटला. या प्रेमापोटीच त्याने सचिनची छायाचित्रे, वृत्तपत्रे आणि मासिकांमधील कात्रणे आदी सुमारे १२ हजारांहून अधिक खजिना जमा केला आहे. डोळ्यांनी ७५ टक्के अंधत्व आणि रातआंधळेपणा या आजारांवर मात करून तो सचिनच्या संग्रहाचे प्रदर्शन विविध ठिकाणी आयोजित करून आपला चरितार्थ चालवतो.
वयाच्या १२व्या वर्षीपासूनच चिरागने सचिनच्या संग्रहाचा ध्यास घेतला होता. नववीत असताना चिरागच्या शाळेतल्या शिक्षिकेने त्याला खास क्रीडाविषयक मासिके वाचण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मात्र त्याच्या संग्रहात झपाटय़ाने भर पडत गेली. एका सात वर्षांच्या मुलाने सचिन, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली एकत्रित असलेले दुर्मीळ छायाचित्र आपल्याला दिल्याचे चिरागने आवर्जून सांगितले.
सध्या मानव संसाधन विषयात एमबीए करणारा चिराग सांगतो, ‘‘लहानपणापासूनच सचिनच्या फलंदाजीची छाप माझ्यावर आहे. १९९९मध्ये सचिनने शारजात साकारलेल्या दोन अद्भुत खेळींमुळे हे नाते अधिक घट्ट झाले. सचिनचे लहानपण, विनोद कांबळीची सोबत इथपासून ते त्याची निवृत्ती आणि त्यानंतरची त्याची वाटचाल या संग्रहात मी समाविष्ट केली आहे.’’
चिरागने सचिनच्या संग्रहाव्यतिरिक्त त्याची इत्थंभूत आकडेवारीसुद्धा जमा केली आहे. यात कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधील सचिनचा महिने, आठवडे, प्रत्येक कसोटीतील प्रत्येक दिवशी केलेल्या धावा, शतके, सामनावीर, मालिकावीर, स्पध्रेतील सर्वोत्तम खेळाडू, झेल, बळी, आदी अनेक गोष्टींचा समावेश आहे. सचिनशिवाय राहुल द्रविड आणि भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांचाही संग्रह त्याने केला आहे.