भारताचा कर्णधार अजय रेड्डीचा अष्टपैलू खेळाच्या जोरावर भारताने दृष्टीहिन क्रिकेट विश्वचषकात बांगलादेशवर १० गडी राखून मात केली. दृष्टीहिन खेळाडूंसाठीचा पाचवा विश्वचषक सध्या दुबई येथे खेळवण्यात येतो आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय स्विकारलेल्या बांगलादेशने ४० षटकांमध्ये ८ गड्यांच्या मोबदल्यात २२६ धावा उभ्या केल्या. प्रत्युत्तरादाखल भारताने बांगलादेशने दिलेलं आव्हान अवघ्या १८.४ षटकांमध्ये पूर्ण केलं.

भारताचा कर्णधार अजय रेड्डीने ६० चेंडुंमध्ये १०१ धावा पटकावल्या. त्याच्या या खेळीत १४ चौकारांचा समावेश होता. त्याला दुसऱ्या बाजूने सुनील रमेशने ५७ चेंडुंमध्ये १०५ धावांची खेळी करत चांगली साथ दिली. रमेशच्या शतकी खेळीत १७ चौकारांचा समावेश होता. कर्णधार अजय रेड्डीने ८ षटकांत ४ गडीही टिपले.