जी रम्य कल्पना कधीतरी सत्यात उतरेल या आशेवर प्रत्येक क्रिकेटर डोळे लावून बसलेला असतो तो स्वप्नातला जादुई क्षण पदार्पणानंतर चौदा वर्षांनी दिनेश कार्तिकच्या आयुष्यात आला. जिंकण्याकरता शेवटच्या चेंडूवर षटकार हवा आहे, कोट्यावधी क्रिकेटवेडे लोक टीव्हीसमोर बसले आहेत, त्या क्षणाला संपूर्ण भारतात लोक फक्त आणि फक्त तुम्हाला पहातायत, तुमच्यासाठी प्रार्थना करतायत, सगळे श्वास रोखले गेलेत, लोकांच्या मुठी आवळल्या गेल्या आहेत, हाताचे तळवे घामेघुम झाले आहेत. गोलंदाज येतो. चेंडू टाकतो. असंख्य तणावग्रस्त लोक तर डोळे बंद करून घेतात. आणि तुम्ही खेळातल्या इतक्या वर्षांच्या तपश्चर्येच्या पुण्याईवर स्थितप्रज्ञतेने षटकार खेचता. हाच तो क्षण. भारतीय क्रिकेट रसिक बेभान झालेत, तुमचे संघातिल सहकारी तुम्हाला अत्यानंदाने आलिंगन देतायत. (तुम्ही त्या सेलिब्रेशनमध्ये नॉक डाऊन झाला आहात). क्षणार्धात शेकडो टीव्ही चॅनेल्स वर फक्तं तुमची चर्चा सुरू झालीये. तुमचे क्रिकेट करिअर सार्थकी लागलंय. ह्याचसाठी केला होता सारा अट्टाहास ही तुमची भावना दाटून आलिये.

“प्रिय दिनेश कार्तिक, क्रिकेटवरच्या प्रेमापोटी गेल्या चौदा वर्षात कमबॅकवर कमबॅक करून जिगरीने लढत राहिलास. तुझ्या जिगरीचे चीज झाले. तुझ्या या सर्वोच्य आनंदी क्षणात आम्ही मनमुरादपणे सहभागी आहोत.”

‘कार्तिक कॉलिंग कार्तिक’च्या धर्तीवर ‘कार्तिक विनिंग कार्तिक’ असा हा क्षण. कार्तिकने दाखवला प्युअर क्लास:

आठच चेंडूच्या खेळीत कार्तिकने कौशल्य, ताकद, अनुभवातून आलेला चाणाक्षपणा, स्थिरचित्त अशा भल्याभल्यांना हुलकावणी देणाऱ्या चार गुणांचे एकत्रित दर्शन घडवून सुपेरहिरोच्या स्थानावर झेप घेतली. चेंडुप्रमाणे फटके मारायला लागणारे कौशल्य तासंतास केलेल्या सरावातून प्राप्त होते. त्याने मारलेला पहिला षटकार लो फुलटॉस वर लॉंग ऑनचा वेध घेऊन मारला होता. दुसरा षटकार केवळ अद्वितीय होता. खोल टप्याच्या चेंडूला असामान्य टायमिंगने त्याने स्केअर लेगला स्टँडमध्ये भिरकावले. रोहितला अभिमान वाटला असेल हा शॉट बघून. शेवटचा षटकार म्हणजे एक्सट्रा कव्हरला फ्लॅट सीमारेषेबाहेर. विलक्षण ताकदीने मारलेला फटका होता हा. कारण सौम्य सरकारचा हा चेंडू खूप वेगवान नव्हता. त्यामुळे बॅट स्पीडच्या निर्मितीतून हा षटकार गेला. या खेळीत प्रत्येक चेंडूला त्याने गोलंदाजाचे मन ओळखले आणि क्रिज न सोडता फटके मॅनीप्युलेट केले. शेवटचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर खोल असेल हा त्याने बांधलेला अंदाज मास्टर स्ट्रोक ठरला. हाच तो अनुभवातून आलेला चाणाक्षपणा. हे सर्व करताना त्याचा स्वतःच्या क्षमतेवर गाढ विश्वास असल्याने त्याचे चित्त कमालीचे स्थिर होते. (भारताच्या यष्टिरक्षकांना याचे वरदान मिळालेले असावे.) सामना संपल्यावर दिलेल्या मुलाखतीत ‘असे स्थिरचित्त अनुभवातून येते’ असे नम्रपणे नमूद केले तेव्हा अनेकांना त्याचा हेवा वाटला असेल.

या सामन्यात जो गुण भारताच्या कामी आला आणि ज्याने बांगलादेशचा घात केला तो म्हणजे क्रिकेटिंग शॉट्स खेळण्यावर विश्वास. बांगलादेशने फलंदाजी करताना चेंडू कुठेही पडो त्याला लेग साईडलाच मारायचा अशा मानसिकतेने फलंदाजी केल्याने ज्या चेंडूला ऑफ साईडला चौकार षटकार मारता आले असते ते आडव्या बॅटने लेग साईडला मारल्याने त्यांना अनेक धावांना मुकावे लागले. भारताच्या विजय शंकरने तशी फलंदाजी केल्याने त्याला झगडावे लागले. या उलट रोहित, के.एल. राहुल आणि कार्तिकने चेंडूच्या दिशेप्रमाणे शॉट्स खेळले आणि जास्तीत जास्त फायदा उठवला. अपारंपरिक फटक्यांचा वापर क्वचित आणि धक्कातंत्र म्हणून केला. उदा. कार्तिकने मारलेला स्कूप शॉट. बांगलादेशच्या अनेक फ्लनदाजांचा आडव्या बॅटने घात केला. कुणी उंच झेल देऊन बाद झाले तर कुणाचे त्रिफळे उडाले. काही फलंदाजांनी आल्या आल्या रिव्हर्स स्वीपचे केलेले प्रयत्न अनाकलनीय होते.

शेवटच्या चेंडूवर षटकार मारून सामना जिंकण्याचा आनंद अवर्णनीय. त्याच बरोबर बांगलादेश संघ या विफलतेतून कसा आणि कधी बाहेर येतो हे पहावे लागेल.
रवि पत्की – sachoten@hotmail.com