cricket-blog-ravi-patki-670x200अॅलेस्टर कुकने कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावा पूर्ण केल्या. इंग्लिश क्रिकेटमध्ये कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा ज्यांच्या नावावर आहेत त्यात पहिला व दुसरा क्रमांक अनुक्रमे कुक आणि ग्रॅहॅम गूच यांचा आहे. हा योगायोग नव्हे. गूच ईसेक्सचा खडूस फलंदाज. सराव, स्वयंशिस्त, फलंदाजीवर विलक्षण प्रेम आणि स्वत:च्या विकेटचे प्राणाइतके मोल जपणारी ईसेक्स संस्कृती गूचने जपली. हीच संस्कृति त्याने अॅलेस्टर कुक नावाच्या पट्ट शिष्याकडे संक्रमित केली. कुकने तितक्याच निश्चयाने ती पुढे नेली. वास्तविक डावखुरा फलंदाज नेत्रसुखद असतो. त्याने मारलेला एक कवर ड्राइव्ह दिवसाचे तिकीट वसुल करतो. परंतु, कुकने अॅलन बॉर्डरची शैली अंगिकारली डेविड गॉवरची नव्हे. या शैलीत परिणामाला महत्त्व असते शैलीला नव्हे. कवर ड्राइव्ह मारल्यावर तुमचा फॉलोथ्रू फोटोत कैद करुन तासंतास बघत रहावा, असे वाटते तो फलंदाज उत्तम अशी फलंदाजीची व्याख्या ईसेक्सच्या शाळेची नाही. पोषक आणि विपरित दोन्ही परिस्थितीत विकेटवर घर करून संघाची नाव किनाऱ्याला लावणारा फलंदाज मोठा ही ईसेक्सची आणि इंग्लंडची सुद्धा क्रिकेट संस्कृती. क्रिकेटच्या भाषेत ज्याला अग्ली रन्स म्हणतात (कशाही करा पण धावा करा) त्या करण्यात चंदरपॉल आणि स्टीव वॉप्रमाणे कुकचे नाव घ्यावे लागेल. कुक बॉटम हॅंड फलंदाज आहे. त्याचे ड्राइव्ज हात आखडून मारलेले असतात. मुक्त हाताने नव्हे. गोलंदाजाबरोबर अहंकाराची लढाई तो कधीच करत नाही. उलट खेळपट्टी, वातावरण, सामन्याची स्थिती, गोलंदाजाचे कौशल्य या सर्वांचा आदर करून तो स्वत:च्या अस्तित्वाची लढाई कोणत्याही बडेजावाशिवाय खेळत असतो. भारतात येऊन भारताच्या खेळपट्टयांवर अश्विन आणि ओझाला चित करून मालिका जिंकणे किती परदेशी फलंदाजाना जमले आहे? कुकने ते करून दाखवले. अॅंडरसन, ब्रॉड, फिन, स्वान अशा प्रतिभावान गोलंदाजांची साथ मिळाल्याने त्याने अॅशेस मालिकेत विजय तसेच दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या देशात जाऊन हरवण्याची मोरपिसे आपल्या कर्णधाराच्या मुकुटात खोवली. २०१४ सालच्या अॅशेसमध्ये ५-० असा सपाटून मार खाल्यावर मायकेल अॅथरटर्नने सगळ्या जगासमोर त्याला निवृत्तीबाबत विचारले होते. परंतु इंग्लंड बोर्डाने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने २०१५ ला अॅशेस जिंकून तो सार्थ ठरवला.
दहा हजार धावा सचिनपेक्षा लवकर पूर्ण झाल्यावर सचिनचे सर्वाधिक धावांचे रेकॉर्ड तो मोडू शकतो, अशी चर्चा आत्ताच इंग्लंडमध्ये सुरु झाली आहे. इंग्लंडचे लोक पटकन स्वप्नरंजनात रमतात हे तितकेच खरे. अॅंड्रू स्ट्रॉसने आगमनानंतर शतकांचा सपाटा लावला होता तेव्हा सचिनचा शतकांचा विक्रम तो मागे टाकणार, अशी जोरदार चर्चा होती.  तसेच त्यांना प्रत्येक अष्टपैलू खेळाडूत फार लवकर बोथम दिसतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उद्याचे सांगता येत नाही. तिथे अजून साडेपाच हजार धावांविषयी बोलणे खूप घाईचे होईल. फिटनेस, फॉर्म, मानसिक संतुलन, नवनवीन प्रतिभावान गोलंदाजांचे आव्हान, कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे भान या सर्व गोष्टींना तिशीनंतर पेलणे खूपच अवघड असते. कुक ही सर्व आव्हाने पेलणार का, हे पाहावे लागेल. वन डे आणि टी 20 चा व्याप त्याच्या मागे नसल्याने फिटनेस राखण्यात तो यशस्वी होउ शकतो. बाकी अनेक गोष्टी खेळाडूच्या थेट नियंत्रणाखाली नसतात.
ब्रिटिश लोकांना त्यांचे नायक कर्तव्यदक्ष आणि प्रसिद्धीपराङ्मुख असलेले आवडतात. कुक ब्रिटिशांच्या सामाजिक मानसिकतेचा आणि क्रिकेटच्या संस्कृतीचा ध्वजधारक आहे. त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा !!!
– रवि पत्की
sachoten@hotmail.com