वर्ल्डकपमध्ये भारताने सहाव्यांदा पाकिस्तानला धूळ चारली. टॉसपासून शेवटच्या चेंडूपर्यंत भारताने ज्याचं स्वप्न बाळगलं असेल, तशाच पटकथेप्रमाणे नाट्य घडलं. चाळीस षटकं अतिशय संयमी फलंदाजी, मधल्या षटकात चपळाईने घेतलेल्या एकेरी-दुहेरी धावा, चौकार आणि षटकार मारण्याकरता निवडलेले कमी जोखमीचे फटके या सगळ्याचा परिपाक म्हणजे धावफलकावर लागलेल्या ३०० धावा. नेहमीप्रमाणे पाकिस्तानने दोन अतिमहत्त्वाचे झेल सोडले. दोन्ही कोहलीचेच. एक लॉंगऑनला सोडला आणि एक यष्टीरक्षकाने. कोहलीने १०७ धावा करून मॅच संपवून टाकली. गोलंदाजी पाकिस्तानचं बलस्थान मानलं जातं. पण आत्ताची गोलंदाजी बघून तो दबदबा पण आता राहिला नाही, हे लक्षात येतं. इरफान, वहाब, सोहेल खान यापैकी कुणीच दहशत निर्माण करणारा गोलंदाज सिद्ध झाला नाही. आफ्रिदी आणि यासीर शहा या स्पिनर्सना आपण विकेट्स देणं शक्य नव्हतं. अजमल आणि हाफीज हे दोन फेकी गोलंदाज संघात नसल्याने लबाडीनंसुद्धा विकेट्स घ्यायची सोय राहिली नाही. धवन, कोहली, रैना यांनी आदर्श फलंदाजी केली. शेवटच्या पाच षटकांत पाकिस्तानने चांगली गोलंदाजी केली पण तोपर्यंत मोठा स्कोअर झाला होता.
ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर ३०० धावा चेस करणं भारतीय उपखंडातील देशांना अवघड आहे. खेळपट्टीवरच्या बाऊन्समुळे गोलंदाजांना कायम संधी असते. पाकिस्तानची कच्ची फलंदाजी ३०० धावा करणं फार मुश्कील होतं. शमी आणि अश्विन यांनी काही वरच्या दर्जाचे स्पेल टाकले. अश्विनची फ्लाईट आणि लाईन बघून आनंद झाला. आक्रमक गोलंदाजी केली त्याने. हारिस सोहेलला पाच विविधतेचे चेंडू टाकून सहाव्या चेंडूवर बरोबर पाहिजे तेव्हढा टर्न मिळवून घेतलेली विकेट हा आपल्या गोलंदाजीतला सर्वात रोमांचकारी क्षण होता. त्या षटकाला अभिजात क्रिकेटचं कोंदण होतं. मोहित शर्माचे वैशिष्ट्यपूर्ण स्लोवर वन्स हुरुप देणारे होते. गोलंदाजी करताना पाकिस्तानने शेवटच्या पाच षटकांपर्यंत स्लोवर वन वापरलेच नाहीत हे आश्चर्यकारक होतं. थर्टीयार्डमधले रैना, जडेजा, कोहली, रहाणे अपेक्षेप्रमाणे खूपच चपळ क्षेत्ररक्षक सिद्ध झाले. रैनाने स्लीपमध्ये आणि कोहलीने मागे पळत सुरेख झेल घेतले. मिसबाह संयमाने फलंदाजी करतो पण तो जेव्हा फलंदाजीला येतो तेव्हा सामना पाकिस्तानने गमावल्यात जमा असतो.
एकूण काय पाकिस्तानच्या नेहमीच्या उणीवा हेरून भारताने छान व्यूहरचना केली. पाकिस्तानची संघ गुणवत्ता उणीवांना सुधारणारी नसल्याने ते सहज पराभूत झाले. मॅचच्या सुरुवातीला एखाद्या पाकिस्तानच्या खेळाडूने ऐनवेळेस काहीतरी चमत्कार केलाच तर पाकिस्तानला ३० टक्के चान्स आहे, असं वाटत होतं. पण कोणताही चमत्कार न झाल्याने भारताला सोपा विजय मिळाला.
– रवि पत्की
sachoten@hotmail.com
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)