cricket-blog-ravi-patki
वानखेडेवर आफ्रिकेने भारतीय गोलंदाजीची लक्तरे वेशीवर टांगली आणि खेळपट्टी नामक वांग्यावर सगळं तेल ओतल गेलं. खेळपट्टी निश्चित फलंदाज धार्जिणी होती. अगदी गोलंदाजांनी हतबल व्हावे इतकी वाईट होती. त्यात आपल्या फिल्डर्सनी अनेक झेल सोडून आफ्रिकेचा जगन्नाथाचा रथ स्वत: ओढला.
खेळपट्टीच्या विषयात मूळ गोलंदाजीचा मुद्दा बाजूला राहण्याची शक्यता आहे. मूळात भारतीय गोलंदाजी पेंन्शनर आहे. म्हणजे पेंन्शनर नागरिकांचा जसा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो, तसा आपल्या गोलंदाजांचा दृष्टिकोन आहे. म्हणजे बेतशुद्ध, स्वास्थ्यशील, एकमार्गी. पेंन्शनर लोकांच्या दिनक्रमात या गोष्टीना अनन्यसाधारण महत्व असते जे अतिशय योग्य आहे. कारण त्यामुळे त्यांचे आयुष्य निर्विघ्न होते. पण गोलंदाज आइन भरात पेंन्शनर सारखा दृष्टिकोन असणारे असतील तर ते भारतीय गोलंदाज आहेत असं समजायला हरकत नाही. विकेटवर मूव्हमेंट हवी, स्पिन हवा तरच आम्ही काहीतरी करु शकणार हा झाला बेतशुद्धपणा. विकेटवर काहीच होत नाही मग कशाला मी लांब पळत जाऊन जोरजोरात बॉल टाकून दमछाक करू, ही झाली स्वास्थ्यशीलता.
खरं म्हणजे ज्या विकेटवर काहीच मदत मिळत नाही, अशा विकेटला समीकरणातून संपूर्णपणे बाजूला काढून टाकणारे गोलंदाज लागतात. म्हणजे काय? तर विकेटवर मूव्हमेंट अजिबात नाही तर षटकातले सहाही चेंडू खूप वेगात डायरेक्ट बॅट खाली यॉर्कर टाकणारे गोलंदाज. म्हणजे विकेटचा संबंध येत नाही आणि यॉर्कर्समुळे शॉट खेळणे अड़चणीचे होते. अशा अनुकूलनशीलतेला (adaptability) नेटमध्ये वेगळी मेहनत करावी लागते. स्थितीप्रिय गोलंदाज हे करत नाहीत. यॉर्कर म्हणजे वन डे सामन्यातले गोलंदाजाचे हुकमी क्षेपणास्त्र. अनेक वर्ष ओरड होऊनही अजूनही आपल्या गोलंदाजांनी यॉर्कर वर हुकमत मिळवलेली नाही. याला असलेल्या गोलंदाजांची स्थितिप्रियता आणि स्त्रोतांची कमतरता (असे गोलंदाज सापडत नाहीत) ही मुख्य कारणे आहेत. वानखे़डेच्या खेळपट्टीवर भुवनेश आणि मोहित शर्मा यांच्या सारखे अगोदरच निष्पाप गोलंदाज किती निरूपद्रवी ठरतात ते दिसून आले. १३०-१३५ च्या वेगाने (वेग?) बॅटच्या पट्टयात येणारे चेंडू टाकून आपल्या गोलंदाजांनी डिविलयर्स आणि कंपनीची सेवाच सेवा करून टाकली.
मॅच संपल्यावर रवि शास्त्रीने सुधीर नाईकाना विकेटवरुन काही गोष्टी सुनावल्याचे प्रसिद्ध झाले. शास्त्री तसा कॉमेंट्री करतानासुद्धा बरेचदा स्पष्टपणा आणि ‘बोल्ड लॅंग्वेज’ यांच्या सीमारेषेवर घूटमळणारे बोलतो. त्यामुळे रागाच्या भरात तो खरंच काही बोललाच नसेल, असे सांगता येत नाही. कामगिरी दाखवा नाहीतर बाहेर जा, याचा तणाव कुणावर कसा परिणाम करेल सांगता येत नाही. शास्त्रीने अपशब्द वापरले असतील तर तो चूकलाच. पण त्याच्या संघाविषयीच्या समर्पणाविषयी शंकेला जागा नाही.
– रवि पत्की
sachoten@hotmail.com