cricket-blog-ravi-patkiवेस्ट इंडीजविरुद्ध २४६ धावांचे अशक्यप्राय वाटणारे लक्ष्य लिलया पेलून सामना सहज जिंकणार असे वाटत असतानाच एका धावेने घात केला आणि सर्वोच्य धावसंख्या यशस्वीरित्या पार करण्याच्या भारताच्या स्वप्नाचे दोन तुकडे झाले.
ब्रावोने शेवटच्या चेंडूवर धोनीच्या बलक्षेत्रांची नाकाबंदी केली. ब्रावोच्या फील्ड प्लेसिंग्समुळे धोनीला वेगळा विचार करण्यास प्रवृत्त केले. त्यामुळे धोनीने शेवटच्या चेंडूवर दोन धावा मिळवायच्या, असे ठरवून कवर्सच्या डोक्यावरून अलगद चिप शॉट खेळून दोन धावा पळून काढायच्या अशी रणनीती आखली. ब्रावोने शेवटचा चेंडू टाकण्याअगोदर भरपूर वेळ काढून धोनीला तंगवले. क्रिकेटच्या मैदानावरील बुद्धिबळाचे अफलातून दर्शन होते ते. ब्रावोने स्लोवर वन टाकला (त्यात तो उस्ताद आहेच). त्यामुळे धोनीचा फटका शॉर्ट थर्डमॅनला सॅम्युअल्सच्या हातात गेला. धोनीने म्हटल्याप्रमाणे त्याची फटक्याची निवड योग्य होती पण अंमलबजावणी चुकली. ब्रावोला त्याचा अनुभव आणि कौशल्य कामी आले हे तितकेच खरे. कारण त्याने शेवटचे पूर्ण षटकच भन्नाट टाकले. त्या षटकात त्याने एक सुरेख नियंत्रित केलेला बाउंसरसुद्धा टाकला. धोनीचा शेवटच्या चेंडूवरचा फटका आणि त्याचे बाद होणे हे २००७ च्या टी२० विश्वचषकातील अंतिम सामन्यात जोगिंदर शर्माच्या गोलंदाजीवर मिस्बाह बाद झाल्याची आठवण करुन देणारे होते. तितकाच रोमांचकारी क्षण, तसाच स्लोवर वन, मिस्बाहचा असाच अलगद फटका आणि मिस्बाह बाद. फरक फक्त फील्ड पोजिशनमध्ये होता. मिस्बाह शॉर्ट फाइन लेगला तर धोनी शॉर्ट थर्डमॅनला बाद झाला. म्हणजे एकाची लेग साईड तर एकाची ऑफ. पण दोघेही बाद झाले ४५ अंशाच्या स्थानीच.
अशा प्रसंगात शेवटच्या चेंडूवर हल्ला करायचा का गॅपमध्ये मारून धावा पळायच्या हा निर्णय त्या क्षणाला फलंदाजानेच घ्यावा, असे सर्वसाधारण मत असते. त्या फलंदाजाला पूर्ण पाठिंबा द्यायचे संघाचे सूत्र असते.
एवढ्या धावसंख्येचा जबरदस्त पाठलाग केल्याबद्दल भारतीय संघाचे, राहुल, रोहित आणि धोनीचे मनापासून अभिनंदन.
– रवि पत्की
sachoten@hotmail.com