News Flash

BLOG : मार्क निकोलसचे म्हणणं सार्थ ठरविण्याचा सॅम्युअल्सचा प्रयत्न

'चॅम्पियन'ची मुद्रा उमटवण्यासाठी कसोटी आणि वनडे मध्ये खूप मजल मारायची आहे

विंडीजने विंडीजस्टाईल खेळ करून टी 20 विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकला. गेल्या २० वर्षांत कोणीही यावे आणि वेस्ट इंडीजला हरवावे, अशी परिस्थिती झाली होती.

cricket-blog-ravi-patki-670x200विंडीजने विंडीजस्टाईल खेळ करून टी 20 विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकला. गेल्या २० वर्षांत कोणीही यावे आणि वेस्ट इंडीजला हरवावे, अशी परिस्थिती झाली होती. विंडीज खेळाडू ज्या प्रकारचे बेडर आणि बेफ़िकीरीच्या सीमारेषेवरील क्रिकेट खेळतात त्या ब्रॅण्डवर जगातील क्रिकेटरसिक फिदा होते. लॉईड आणि रिचर्ड्सच्या संघाने क्रिकेटवर आणि विशेषत: इंग्लड, ऑस्ट्रेलिया संघांवर जे राज्य केले, त्याला दुर्बलाने सबलावर, कनिष्ठाने ज्येष्ठावर, गुलामाने हुकूमशाहीवर, विस्थापिताने प्रस्थापितांवर विजय मिळवल्याची सांकेतिक स्वप्नपूर्तीची भावना होती. त्यामुळे भारतीय उपखंडातील संघ वेस्ट इंडीजशी सपाटून हरले तरी वेस्ट इंडीज संघाबद्दल उपखंडात कायम कौतुकाची भावना होती. लॉईड आणि रिचर्ड्सच्या संघाने आपल्या कर्तुत्त्वाने या कौतुकाचे रूपांतर दराऱ्यामध्ये केले. गेल्या वीस वर्षांत हा दरारा नाहीसा झाल्याचे शल्य होते. प्रतिस्पर्धी संघाची झोप उडवणारा विंडीज संघ कसोटी सामन्यात तीन दिवसांत शरण येतो, विंडीज गोलंदाजाना जगभरातले फलंदाज फ्रन्टफूटवर येऊन मारतात, एकवेळचा जगज्जेता संघ एकापाठोपाठ एक मालिका हरतो हे दृश्य केविलवाणे होते.
अशा दीनवाण्या परिस्थितीत अपमानास्पद वीस वर्षे काढल्यावर एकापाठोपाठ एक अशी तीन विश्वविजेतीपदे मिळवल्यावर वेस्ट इंडीज संघाने आपल्या स्टाईलने विजयोत्सव साजरा केला. या विजयोत्सवाच्या मुळाशी जोष भावनेऐवजी रोष भावना असल्याने तो उत्सव म्हणजे उन्माद ठरला. असा उन्माद की ज्याने खेळभावना, शिष्टाचार यांची पायमल्ली करून टाकली. कर्णधार सॅमीने आपल्या भाषणातून विंडीज बोर्ड आणि खेळाडू यामधील उणीदुणी जगासमोर धुतली. जग्गजेत्या कर्णधाराला साजेसे असे ते भाषण होते का? त्या रोषामध्ये इंग्लंडच्या संघाला, संयोजकांना, प्रायोजकांना आणि वेस्ट इंडीज प्रेक्षकांइतकेच प्रेम देणाऱ्या भारतीय प्रेक्षकांना धन्यवाद देण्याचे सुद्धा तो विसरला. मार्क निकोलसने विंडीज खेळाडूंना बुद्धिहीन संघ म्हणून डिवचले होते, असे सॅमी म्हणाला. मॅच संपल्यावर सॅम्युअल्सने जे वर्तन केले ते पाहता सॅम्युअल्स् निकोलसचे म्हणणे खरे करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे, असे वाटत होते. शर्ट काढून प्रतिस्पर्धी संघाच्या दिशेने पळत जाणे, मॅन ऑफ़ द मॅचचा चषक उद्दामपणे फेकून देणे, पत्रकार परिषदेत टेबलवर पाय ठेवून बसणे, असे बेबंद वागणारे खेळाडू जगभरातल्या युवा खेळाडूंसमोर काय आदर्श ठेवणार? (तुम्ही जिंकलात याचा मनापासून आनंद झाला. पण तुमच्या टीकाकारांवर तुमची नाराजी दाखवणारी ही वागणूक समर्थनीय अजिबात नाही) लॉईड आणि रिचर्ड्सच्या संघावर लोक प्रेम करायचे कारण ते जग्गजेते होते. तरीसुद्धा त्यांच्या कॅलिप्सो स्टाईलमध्ये कुठेही कटुता नव्हती, छ्छोरपणा नव्हता, उद्दामपणा नव्हता. इसलिए उन्होंने दिलोंपे राज किया, हे कसले अजिंक्यवीर? त्यांच्या वागणुकीमुळे हे खेळाडू विंडीज बोर्डाला नियंत्रित ठेवणे किती अवघड जात असेल हे दिसले. विंडीज खेळाडूंच्या स्वभावात विलासाचा एक गडद रंग आहे जो क्रिकेट सारख्या अत्यंत व्यावसायिक खेळातील प्रगतीला चांगलाच बाधक ठरतो. अनेक खेळाडूंचे चांदणी जीवन, काही खेळाडूंच्या उत्तेजक द्रव्य घ्यायच्या आणि ड्रग टेस्ट चुकवायच्या सवयी, सराव आणि नियमितता यांच्या गांभीर्याचा अभाव या गोष्टी लगेच सुधारतील, असे वाटत नाही. या टी 20 वर्ल्डकपचे विजेते झाल्यामुळे आपण त्यांचे अभिनंदन करुया पण ‘चॅम्पियन’ची मुद्रा उमटवण्यासाठी कसोटी आणि वनडे मध्ये खूप मजल मारायची आहे. त्यासाठी लागणाऱ्या योग्य प्रयत्नांसाठी विंडीज बोर्डाला आणि संघाला मनापासून शुभेच्छा देऊया.
– रवि पत्की
sachoten@hotmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2016 12:55 pm

Web Title: blog by ravi patki on west indies win icc t 20 world cup
Next Stories
1 क्रिकेटच जगतो आहे ! दिलीप वेंगसरकर
2 बीसीसीआयचे निधीकपात धोरण आणि गावस्कर यांना अर्धचंद्र
3 बीसीसीआयचे क्रिकेटसाठी योगदान काय?
Just Now!
X