२०१५ ची विम्बल्डन स्पर्धा पार पडली. जोकोविच आणि सेरेनाने बाजी मारली. सेरेनाच्या खेळात आणि मानसिकतेमध्ये २० मेजर स्पर्धा जिंकल्याचे तेज आले आहे. जिंकल्याचा एवढा अनुभव असलेला कोणताही खेळाडू अतिशय खंबीर असतो. कारण असंख्य वेगवेगळ्या परिस्थितीतून गेलेला असल्याने अनुभवाच्या जोरावर कोणत्याही बिकट परिस्थितून सहिसलामत बाहेर येण्याचे जबरदस्त कौशल्य आणि मनोबल अशा खेळाडूकडे असते. सेरेना हरणार असे अनेक वेळा या विंबलडनमध्ये वाटले होते. विशेषत: हेदर वॉटसनविरुद्ध शेवटच्या सेट मध्ये ०-३ मागे असताना इंग्लिश चाहत्यांनी जल्लोष सुरु केला होता. पण अजिंक्यविराला साजेसा खेळ करत आणि अफाट आत्मविश्वासाचे प्रदर्शन करत तिने सामना खेचून आणला. सेरेना शिखरावर जाऊन बसली आहे आणि इतर महिला खेळाडू अजून पायथ्याला आहेत असे वाटते. महिला एकेरित सेरेनाला पहिले पाच रॅंकिंग आणि नंतर सहा पासून इतर अशी स्थिती आहे. नुसते ताकदीचे फटके नाहीत तर विलक्षण सातत्याने बिनचुक फटके मारणे, अचाट स्टॅमिना यामुळे तिला गाठणे महामुश्किल झाले आहे.
जोकोविचसुद्धा तग धरण्याच्या क्षमतेवर प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करतो. फिटनेसने साथ दिली तर तो अजून पाच मेजर्स नक्की जिंकू शकतो. फेडररचे लालित्य अबाधित आहे. त्याचे वय त्याला फक्त शाळेचा दाखला पाहिल्यावरच आठवत असावे. फक्त विम्बल्डनच्या गवतावरच नाही तर सगळ्या कोर्टसवर तो एव्हरग्रीनच आहे. मरेला घरच्या कोर्टवर अख्ख्या इंग्लंडसमोर तीन सलग सेट मध्ये तो अजूनही आडवा करू शकतो म्हणजे बघा.
आपल्या पेस आणि सानियाने भारताचा झेंडा रोवला. पेस, भूपति, सानिया यांनी विम्बल्डनमध्ये भारताचे नाव कोरल्यामुळे मस्त वाटते. अशा वेळेस राहून राहून आठवण येते ती १९७३ च्या अमृतराज विरुद्ध चेकस्लोव्हाकियाचा यान कोडेश यांच्या क्वार्टर फायनलची. कोडेश शेवटच्या सेट मध्ये ४-५, ०-३० ने मागे होता. दोन पॉइंट आणि अमृतराजची सेमीफायनल नक्की होती. अमृतराजने अख्ख कोर्ट रिकामं असताना ओवरहेड स्मॅश बाहेर मारला. नंतर कोडेशने ती मॅच आणि अंतिम सामना पण जिंकला. अमृतराज म्हणतो की ‘मी त्या वर्षी विम्बल्डन नक्की जिंकलो असतो.’ वैयक्तिक खेळात जगामध्ये विम्बल्डनचे जेतेपद सर्वात मानाचे असते असे म्हणल्यास अतिशयोक्ती होणार नाही. एकतर हा खेळ सगळ्या जगात खेळला आणि पाहिला जातो. काही मुठभर देशात नव्हे. विज्ञानात नोबेल, स्थापत्यशास्त्रातील एखादी आयफेलसारखी वास्तू, जागतिक अर्थव्यवस्थेला क्रांतिकारक दिशा देणारा एखादा अर्थतज्ज्ञ यामुळे जसे एखाद्या देशाचे नाव जागतिक नभावर झळकते तसेच क्रीडा विश्वातील फुटबॉलचे विश्वजेतेपद, विंम्बल्डनचे एकेरी जेतेपद ही पताकास्थाने आहेत. ते दोन पॉइंट आपल्याला अजून इतके अस्वस्थ करतात तर बिचारया अमृतराजचे काय?
– रवि पत्की
sachoten@hotmail.com
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)