घरातल्या प्रत्येक कार्यामध्ये ज्या मुलाशिवाय पान हलत नाही तो जबाबदार कर्तव्यदक्ष मुलगा शिक्षणाकरिता परदेशी गेल्यावर जसं घरच्यांना पदोपदी जाणवत राहतं, शक्तीचं मनगट, जबाबदारीचे खांदे, धीराचा हात नसल्यामुळे क्षणोक्षणी हतबलता, पंगूपणा जाणवतो तसं सध्या सचिन नसल्यामुळे भारतीय संघाला विश्वचषकाच्या उंबरठय़ावर जाणवत असणार. मैदानावर, ड्रेसिंग रूममध्ये त्याचं अस्तित्वच इतकं खात्री देणारं, प्रेरणादायी होतं. अगदी शेवटच्या विश्वचषकातसुद्धा वयाच्या ३८व्या वर्षी त्यानं धावांच्या राशी रचल्या. त्याच्या वयावरून ऊठसूट टवाळी करणाऱ्यांना जबरदस्त चपराक दिली. इंग्लंड, साऊथ आफ्रिकेविरुद्ध शतकं, ऑस्ट्रेलियाविरुद्ध क्वार्टर फायनलमध्ये अतिशय निर्णायक अर्धशतक आणि पाकिस्तानविरुद्ध उपान्त्य सामन्यात ८५. अजून काय पाहिजे? तरी काही नेहमीच्या टीकाकारांनी सवयीप्रमाणे तो अंतिम सामन्यात फेल गेला म्हणून आरडाओरडा केला. ते नेहमीचंच होतं. सचिननं पहिल्यापासून खेळायचं. मॅच सेट करायची आणि मग त्यानंच शेवटपर्यंत थांबून जिंकून द्यायची अशी ‘छोटीशी’ मागणी या लोकांची असे. जणू उरलेले दहा खेळाडू सहलीला स्टेडियममध्ये गेलेले असायचे. असो! गेल्या सहा विश्वचषकांत आपला सरसेनापती असलेला सचिन आता निवृत्त झाल्यानं संघ निर्नायकी झाला आहे हे नक्की. कोहली, धोनीसारखे अतिशय समर्थ खेळाडू असले तरी पाठीला कणा नाही हे जाणवतंय.
सचिनची सहा विश्वचषकांतील कामगिरी पाहिली तर १९९६ सालचा सचिन मला सर्वश्रेष्ठ वाटतो. त्या सचिननं भारतीय फॅन्सना वेड लावलं. तेव्हा तो गोलंदाजीच्या चिंध्या करायचा. श्रीलंकेविरुद्ध दिल्लीला १३७, मुंबईला ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९०, ग्वाल्हेरला वेस्ट इंडिज विरुद्ध ७० या खेळी घणाघाती होत्या. बॅकफूट पंच, जलद गोलंदाजांना मारलेले मिड ऑन आणि मिड विकेटच्या मधून जाणारे पूल, फूललेंथ बॉलला मिड विकेटवरून जाणारा लॉफ्टेड पिकअप शॉट, मुरली आणि वॉर्नला पुढे येऊन स्टँडमध्ये फेकून दिलेले उंचच उंच टोले, अ‍ॅम्ब्रोज वॉल्शला ठरवून मारलेले फ्लिक्स, वासला नामोहरम करणारे स्ट्रेट ड्राइव्हज. सचिन तेव्हा बॉलवर चालून जायचा. २००० सालानंतर बॉलला बॅटवर येऊ देऊन गोलंदाजाचा वेग वापरून तो धावा जमवत असे. पण १९९२-२००० मध्ये त्याला दैवीशक्तीचा कृपाप्रसाद लाभला होता. प्रेक्षक आ वासून त्याची फलंदाजी बघत. क्रिकेटमध्ये असे फटके मारता येतात आणि तेसुद्धा एक भारतीय मारू शकतो हे अविश्वसनीय होते. २००३चा सचिन १९९६च्या ६० टक्के जवळ जाणारा होता. इंग्लंड आणि पाकिस्तान विरुद्ध त्यानं केलेल्या खेळी लाजवाब होत्या. पाकिस्तानविरुद्धची त्याची ९८ धावांची खेळी अजरामर ठरली. त्या सामन्याचा बोलबाला एक वर्ष आधीपासूनच झाला होता. राजकीय वातावरण तापलेलं असल्यानं पाकिस्तानला धडा शिकवायला हवा असं क्रिकेट रसिक ओरडत होते. त्या आव्हानात्मक परिस्थितीत सचिननं पाकिस्तानवर एकटय़ा बहाद्दरानं शत्रुसैन्यात घुसून कापून काढावं तसं पाकिस्तानी संघाला आसमान दाखवलं. त्या दिवशी भारतीयांचा स्वाभिमान टिपेला पोहोचला. विश्वचषकात पाकिस्तानला हरवणं म्हणजे दुधात साखर आणि त्यात सचिनचं वादळ म्हणजे दुधाला केशराचा रंग आणि गंध. भारताच्या सैन्यप्रमुखापुढे पाकिस्तानचा सैन्यप्रमुख वाघा बॉर्डरवर गुडघे टेकून पायावर डोकं ठेवून माफी मागत आहे असं चित्र भारतीयांनी त्या दिवशी चितारलं होतं.
त्याच्या गाढ तपश्चर्येला २०११ साली फळ मिळालं. २२ वर्षांच्या मेहनतीनंतर. आत्ताच्या खेळाडूंना एवढी तीव्र इच्छाशक्ती किती वर्ष जोपासता येईल माहीत नाही.
खरंच, ‘इट इज डिफिकल्ट टू इमॅजिन. सचिन इज नॉट इन!
– रवि पत्की
sachoten@hotmail.com
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)