धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. ६० कसोटी सामन्यांत त्याला कर्णधारपदाची जबाबदार मिळाली. खेळाडू धोनी आणि कर्णधार धोनी असा वेगळा ताळेबंद धोनीचा मांडावा लागेल. खेळाडू धोनीअंतर्गत भारतातील कामगिरी आणि परदेशातील कामगिरी असे दोन वेगळे विषय आहेत. भारतीय खेळपट्टय़ांवर कसोटी सामन्यात आपल्याला लाभलेला सर्वोत्तम यष्टिरक्षक फलंदाज म्हणून धोनीने नाव कमावले. त्याच्या फलंदाजीतील कौशल्यामुळे त्याचे यष्टिरक्षण झाकोळले गेले. परंतु भारतीय खेळपट्टय़ांवर स्पीनर्सना त्याने केलेले यष्टिरक्षण सर्वोत्तम होते. स्टम्पच्या अगदी जवळ उभे राहून फलंदाजांचे आऊटसाईड एजेस त्याने सहज पकडले. गुडघ्याच्या खाली येणारे इनसाईड एजेससुद्धा त्याने अप्रतिम टिपले. त्याच्या प्रतिक्षिप्त क्रिया अफलातून होत्या. स्टम्पिंगला लागणारा अतिचपळपणा त्याच्याकडे ठासून भरला होता. त्याने केलेले अनेक स्टम्पिंग्ज अतिशय मार्जिनल होते. म्हणजे फक्त फलंदाजाचा पाय अलगद हवेत असताना तो बेल्स उडवायचा. कुंबळे, हरभजन, ओझा, अश्विन यांच्या यशात धोनीचा वाटा फार मोठा आहे. त्याने यष्टिरक्षणाला स्ट्रीट स्मार्टनेस दिला. दोन पायांतून अचानक बॉलला स्टम्पवर जाऊ देणे, बॉल हाताने स्टम्पकडे न बघता मागे अंदाजाने टाकणे असे गल्ली क्रिकेटमधले फंडे त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दाखवले. जलदगती गोलंदाजांसमोरसुद्धा त्याने गोलकीपर स्टाईल अफलातून झेल टिपले. गेल्या दोन-तीन वर्षांत मात्र त्याचा स्तर थोडा खाली गेला हे नक्की. इंग्लंडमध्ये लेट स्विंग होऊन येणाऱ्या चेंडूंनी त्याला त्रास दिला. पण कर्णधारपदाच्या अतिरिक्त जबाबदारीने त्याचे यष्टिरक्षण बिघडले असे झाले नाही हे विशेष आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यष्टिरक्षण आणि कर्णधारपद अशी दुहेरी जबाबदारी अनेक वर्षे यशस्वीपणे पार पाडलेले खेळाडू विरळाच. संगकाराने यष्टिरक्षण थांबवले, अ‍ॅलेक स्टुअर्टला पण फार काळ दोन्ही जबाबदाऱ्या जमल्या नाहीत. खरे म्हणजे यष्टिरक्षणामुळे धोनी उत्तम कर्णधार झाला हे नक्की. फलंदाज धोनी भारतात शहनशाह होता. ५ बाद १०० असो किंवा ५ बाद ३००. धोनी ७ नंबरला येऊन काम फत्ते करणार. भारतीय खेळपट्टय़ा त्याला अशा माहीत आहेत जशा शेतकऱ्याला आपल्या जमिनीची खडान्खडा माहिती असते. फलंदाज म्हणून स्पीनर्सचा कर्दनकाळ म्हणून कपिल देव, संदीप पाटील, गांगुली यांच्या पंक्तीत धोनीने स्थान मिळवले आहे. भारताबाहेर मात्र धोनीला फलंदाजी म्हणजे गणिताचा पेपर होता. त्यातून ऑफ स्टम्पच्या बाहेरच्या फूल लेंथ चेंडू म्हणजे गणिताच्या पेपरमधला सहाआकडी भागाकारच. त्या छळवादाला कंटाळून तो बॉलला बॅट लावून टाकायचा. परदेशातील फलंदाजीतील कमकुवतपणा हा परमेश्वराने धोनीला नम्र राहण्याकरिता दिलेला शाप होता. मात्र वेग, बाऊंस वगैरे अस्रांना तो कधी घाबरला नाही. परदेशातील फलंदाजीतील मर्यादेमुळे तो संघातील खेळाडूंचा, जाणकार प्रेक्षकांचा, माजी खेळाडूंचा कसोटी फलंदाज म्हणून आदर मिळवू शकला नाही.
कसोटी कर्णधार म्हणूनसुद्धा धोनीच्या संघाने भारतात २१ विजय मिळवले तर परदेशात ६. मी धोनीने विजय मिळवले असं म्हणत नाहीये. कारण अ कॅप्टन इज अ‍ॅज गुड अ‍ॅज हिज टीम. मला वाटतं, धोनीच्या संघाचे परदेशातील अपयश त्रासदायक आहे. कर्णधार म्हणून धोनी काही गोष्टी करू शकला असता हे नक्की. पहिलं म्हणजे श्रीनिवासन आणि धोनी ही महाशक्तिमान जोडगोळी कार्यरत असताना धोनी निवृत्त होताना भारतीय संघाचा पुढील पाच वर्षांचा न्यूक्लिअस ठरलेला नाही हे त्रासदायक आहे. मुरली विजय, कोहली, रहाणे यांनी सिद्ध केले असले तरी अजून दोन जागा डळमळीत आहेत. राजकारण, सत्ताकारण, अर्थकारण यांना अग्रक्रम दिल्याने कसोटी क्रिकेटमध्ये परदेशात विजय मिळवण्याचा संकल्प श्रीनिवासन-धोनीकडून झाले नाही. ओव्हरमधले सहा चेंडू एकाच टप्प्यावर टाकणारे दोन गोलंदाजदेखील धोनीच्या काळात घडले नाहीत. भुवनेश्वर, प्रवीण, शमी यांनी आशेचा किरण दाखवला. पण कुणी स्टॅमिन्यात कमी तर कुणी सणकी. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका या वेगवान खेळपट्टय़ांवरदेखील फलंदाजांना सळो की पळो करून सोडणारा गोलंदाज भारत तयार करू शकला नाही. सर्व सुविधा, पाठबळ असताना धोनीच्या कारकीर्दीत हे होणे अगदी अपेक्षित होते. त्यामुळे कधीतरी दोन वर्षांत एखादा विजय ही आपली परदेशी कामगिरी जैसे थे राहिली.
कर्णधार म्हणून धोनीने अनेक खेळाडूंना लाँग रोप दिला हे खरे असले तरी गुणवत्ता हेरून पाठपुरावा करून हिरा घडवणे धोनीच्या काळात घडले नाही. त्यामुळे आजही परदेशी मालिकांमध्ये काही फलंदाजांनी केलेली शतके या पलीकडे आपल्या कर्तबगारीची झेप नाही.
कर्णधारपदाची धोनीची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे त्याने व्यक्तिपूजा बंद केली. सांघिक भावनेला महत्त्व दिले. सचिन, सेहवाग, गांगुली, लक्ष्मण, द्रविड यांची सतत नावं घेऊन व्यक्तिपूजा केली नाही. उलट मुलाखतींमध्ये गोलंदाजांना प्रोत्साहन दिले. क्षेत्ररक्षकांना प्रोत्साहन दिले आणि अगदी खोदून खोदून विचारल्यावर फलंदाजांविषयी बोलला. ज्येष्ठ खेळाडूंनादेखील योग्य वेळेस न कचरता त्याने योग्य संदेश दिला. अनेक ज्येष्ठांची त्याने नाराजी ओढवून घेतली असली तरी त्याने ज्येष्ठ खेळाडूंविषयी घेतलेले जवळजवळ सर्व निर्णय भारतीय क्रिकेटला पुढे घेऊन जाणारे होते. तरीदेखील कसोटी क्रिकेटबद्दल बोलताना मी धोनीला म्हणेन, ‘तेरे पास क्या है?’ आणि तो म्हणाला, की ‘मेरे पास दो वर्ल्ड कप है’ तर मी खडसावेन, ‘चल, विषय बदलू नको.’
– रवि पत्की
sachoten@hotmail.com