विशाखापट्टणला भारताने इंग्लंड वर एक परिपूर्ण विजय मिळवला. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण सगळ्यात समाधाकारक कामगिरी केल्याने या विजयाला परिपूर्ण म्हणता येईल. टॉस जिंकणे महत्वाचे होतेच. पण नंतर पाच दिवस खूप चांगला फोकस ठेवल्याने विजय साकार झाला.कोहली आणि पुजाराने सुरेख फलंदाजी केली. अश्विन प्रमाणेच जयंत यादवला चांगली फलंदाजी येते हे सिद्ध झाले त्यामुळे कोहलीचा पाच गोलंदाज घेऊन खेळायच्या आक्रमक निर्णयाला बळ मिळाले.

अश्विनने सरळ जाणाऱ्या चेंडूवर चांगली हुकमत मिळवली आहे हे या सामन्यात प्रकर्षाने जाणवले. इतके दिवस तो विविधतेकरता लेग स्पिन किंवा कॅरम बॉल टाकत होता. ही विविधता फलंदाज ओळखू शकत होते. आता मात्र ऑफ स्पिन च्या ऍक्शन ने सरळ जाणारा चेंडू तो सातत्याने टाकत असल्याचे दिसले.या चेंडूवर ज्यो रुटला त्याने जे भंडाऊन सोडले ते बघायला मजा आली. हा चेंडू भात्यात आणण्याकरता त्याने चांगलीच मेहनत घेतली असणार. सगळ्यात महत्वाची गोष्टं म्हणजे हा चेंडू टाकताना त्याची ऍक्शन स्वछ रहात आहे. नाहीतर ‘दुसरा’टाकताना अनेक गोलंदाजानी नियम धाब्यावर बसवले होते. अजमल, नरेन् आणि ईतर अगणित गोलंदाजानी ‘दुसऱ्याच्या’ नावाखाली किती अनैतिक बळी मिळवले याचा हिशेब नाही.

कोहलीचा आक्रमक स्वभाव खेळाडूंना स्फूर्ती देतो हे खरे असले तरी मैदानावर आपल्याच खेळाडूंना उघड उघड लाखोली वाहणे योग्य नाही. एकदा तर तो स्लिप मधून पळत जाऊन उमेश यादवला मारतो का काय असे वाटले. फलंदाजी करतानाचा कोहली आणि क्षेत्ररक्षणाच्या वेळेस कप्तानी करतानाचा कोहली हे रामकृष्ण मठातिल योगी आणि अफ्रिकेत किरकोळ कारणावरून रस्त्यावर दंगल करणारे सणकी युवक इतके भिन्न वाटतात. आक्रमकता आणि सणकीपणा यात फरक असतो हे कोहलीने लवकर ध्यानात घ्यावे. जेव्हा त्याच्या स्वत: च्या धावा होणार नाहीत तेव्हा ईतर खेळाडूंचा पाठिंबा त्याला मिळेल का हे महत्वाचे. गांगुली प्रमाणे कोहली खेळाडूंच्या मागे भक्कम उभा रहातो हे खरे असले तरी कोट्यावधी लोकांसमोर खेळाडूचा पाणऊतारा करणे योग्य नाही.

इंग्लंड ने चांगला किल्ला लढवला हे खरे असले तरी फक्त टिकून रहाणे या एकमेव उद्देशामुळे त्यांना भारताच्या धावसंखेच्या जवळ जाता आले नाही. २०१२ च्या मालिकेत इंग्लंड ने भारताला भारतात हरवले कारण त्यानी उत्तम बचावाबरोबरच पीटरसन, बेल यांच्या नियोजनपूर्वक आक्रमणाच्या जोरावर भारताला धूळ चारली. मधल्या फळीत पीटरसनची उणीव निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. बेन स्टोक्स चांगलाच आहे पण पीटरसन प्रमाणे तो सातत्याने स्पिनर्सना नामोहरम करेल असे वाटत नाही. या सामन्यात इंग्लिश फलंदाजानी स्पिनर्स विरुद्ध बॅकफूटवर खेळायचे ठरवले होते असे दिसले.मंद गतिने वळणाऱ्या खेळपट्टीवर या तंत्रावर ते २०० षटकं खेळले. (तरी सर्वाधिक पायचितचेच बळी आहेत). अजून वेगाने चेंडू स्पिन झाल्यावर या तंत्राने ते कसे टिकणार? एकंदरित स्पिनर समोर ते फक्त टिकले असं म्हणता येईल पण सामना जिंकण्याकर्ता स्पिनर्स विरुद्ध हुकमतींने खेळता यायला पाहिजे.

भारताचे प्रमुख फलंदाज इंग्लंडच्या फास्ट बोलर्सला बाद झाले. स्पिनर्सला नाही. मोईन, रशीद, अंसारी यांना भारताच्या वरच्या फळीतील विकेट्स घेता आल्या नाहीत ही भारताच्या दृष्टीने चांगली गोष्टं आहे. मोहमद शमीने काही अप्रतिम स्पेल टाकले. तो लवकर दुखापतग्रस्त होतो. त्यामुळे कोहली त्याला जपून जपून वापरत आहे. अगदी शंभर रूपयाच्या नोटेसारखा.
कसोटी मालिका अगदी एकतर्फी होणार नाही हे दिसत असले तरी इंग्लंड चे फलंदाज स्पिनर्स विरुद्ध सकारात्मक राहिले नाहीत तर मालिकेत भारताला विजयी आघाडी लवकरच मिळू शकते.

– रवि पत्की.
Sachoten@hotmail.com