आयपीएलच्या १४ व्या हंगामाला सुरूवात होण्यासाठी जेमतेम ९ दिवस शिल्लक असताना महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्स संघाला मोठा धक्का बसलाय. संघातील ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने आयपीएलमधून माघार घेतली आहे.

हेझलवूडने या वर्षी होणारा टी-२० वर्ल्ड कप आणि अ‍ॅशेस मालिकेचा विचार करुन हा निर्णय घेतल्याचं सांगितलं. शिवाय बायो बबलमधून दूर राहून कुटुंबियांसोबत वेळ घालवायचा असल्याचं त्याने म्हटलं. “बायो बबल आणि निरनिराळ्या वेळेत क्वॉरंटाइन राहून आता १० महिने झालेत. त्यामुळे काही काळासाठी क्रिकेटमधून ब्रेक घेऊन कुटुंबियांसोबत वेळ घालवायचा आहे”, असं हेझललूडने ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट वेबसाइटला सांगितलं. “पुढे हिवाळ्यात आम्हाला खूप क्रिकेट खेळायचं आहे. वेस्टइंडीजचा मोठा दौरा आहे, त्यानंतर बांगलादेश दौरा, टी-२० वर्ल्ड कप आणि नंतर अ‍ॅशेस मालिका. त्यामुळे १२ महीने खूप व्यस्त असणार आहेत. अशात स्वतःला मानसिक आणि शारीरिकरित्या तंदरूस्त ठेवण्यासाठी वेळ देणं गरजेचं आहे. यासाठी आयपीएल २०२१ मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला”, असं तो म्हणाला.

आणखी वाचा- IPL मध्ये कोणीही बोली न लावल्याने म्हणाला होता ‘ही लाजिरवाणी गोष्ट’, धडाकेबाज खेळाडूला SRH ने दिली संधी

यंदाच्या आयपीएलमधून माघार घेणारा हेझलवूड तिसरा ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरलाय. रॉयल चॅलेंजर्सच्या संघातून जोश फिलिप आणि सनरायझर्स हैदराबादच्या संघातून मिशेल मार्श यांनीही मालिकेतून माघार घेतली आहे. चेन्नई सुपर किंग्सचा पहिला सामना १० एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरोधात होणार असून गुरूवारी हेझलवूडने माघार घेण्याचा निर्णय घेतलाय. आयपीएल सुरू होण्यासाठी अगदी कमी दिवस असताना आता हेझलवूडसाठी योग्य पर्याय निवडण्याचं मोठं आव्हान चेन्नईसमोर असेल.