मुंबई मॅरेथॉनची थकबाकी चुकवणाऱ्या प्रोकॅम इंटरनॅशनल कंपनीला मुंबई महानगरपालिकेने गुरुवारी चांगलाच दणका दिला. प्रोकॅमतर्फे आयोजित ‘नेक्सा पी-१ पॉवरबोट इंडियन ग्रां. प्रि. समुद्र शर्यती’च्या औपचारिक घोषणेचा कार्यक्रम गुरुवारी गेट-वे ऑफ इंडिया येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला परवानगी न घेतल्यामुळे पालिकेने या कार्यक्रमावर धडक कारवाई करत बुलडोझरने अडथळे पाडले. प्रोकॅमने पालिकेची थकबाकी न दिल्यामुळे ही कारवाई केल्याचे उपस्थितांनी सांगितले. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार होते, परंतु काही कारणास्तव ते येऊ शकले नाहीत. मात्र क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडल्यामुळे राजकीय चर्चाना उधाण आले आहे. क्रीडामंत्र्यांनी कारवाई होताच कार्यक्रमातून निघून जाणे योग्य समजले.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा यांच्यात चांगलीच जुंपलेली असताना कार्यक्रमातील या योगायोगाला राजकीय रंग चढला आहे. प्रोकॅमतर्फे मार्चमध्ये समुद्र शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची औपचारिक घोषणा गुरुवारी होणार होती. मात्र पालिकेचे अ-विभाग कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त किरण डिगावकर यांच्या पथकाने कार्यक्रमाच्या ठिकाणी धडक कारवाई केली.

कार्यक्रम सुरू होण्यासाठी काही मिनिटांचा कालावधी शिल्लक असताना तावडेंचे आगमन झाले आणि त्याचवेळी पालिकेने बुलडोझरद्वारे अडखळे उखडून टाकले. काही कळण्याआधीच बुलडोझर कार्यक्रमाच्या मुख्य ठिकाणी घुसला आणि सर्वाची पळापळ सुरू झाली. पालिका पुढील कारवाई करण्याआधीच आयोजकांनी सर्व गाशा गुंडाळला व कार्यक्रम पंचतारांकित हॉटेलमध्ये उरकून टाकला. या सर्व गोंधळात क्रीडामंत्र्यांनीही काढता पाय घेणे उचित मानले. तावडे त्यानंतर पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमालाही अनुपस्थित होते.

पालिकेकडून ना हरकत प्रमाणपत्र न घेता हा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे डिगावकर यांनी सांगितले. मात्र यामागे मॅरेथॉनच्या थकबाकीचे कारण असल्याची चर्चा होत होती. मॅरेथॉनची २.७४ कोटी रुपयांची थकबाकी प्रोकॅम पालिकेला देणे आहे. पालिकेने आकारलेले  हे अतिरिक्त शुल्क चुकीचा असल्याचा दावा प्रोकॅमचे सहव्यवस्थापकीय संचालक विवेक सिंग  यांनी केला. ते म्हणाले, ‘‘या ऐतिहासिक घोषणेच्या कार्यक्रमावेळी अशी घटना घडणे दुर्दैवी आहे. पालिकेकडे परवानगीसाठी अर्ज केला होता आणि अखेरच्या क्षणापर्यंत ती मिळेल अशी अपेक्षा होती. ही जागा मुंबई पोर्ट ट्रस्ट, महाराष्ट्र पर्यटन व विकास प्राधिकरण आणि पुरातत्व विभाग यांच्या अखत्यारीत येते. पालिकेच्या अंतर्गत ही वास्तू येत नाही.’’

आयोजकांची अरेरावीची भाषा

‘‘मुंबई मॅरेथॉनचे सर्व शुल्क आम्ही भरले आहे. पालिका आमच्याकडून अतिरिक्त शुल्क मागत आहे आणि ते चुकीचे आहे.  त्याविरोधात आम्ही याचिका दाखल केली आहे. त्यामुळे ही कारवाई चुकीची आहे,’’ असा दावा विवेक सिंग यांनी केला. कार्यक्रमाचे ठिकाण बदलल्यानंतर ‘हे प्रकरण वपर्यंत नेऊ’ अशी भाषा सिंग करू लागले. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पी १ पॉवर बोट शर्यत

  • मुंबईत पहिल्यांदाच पी १ पॉवरबोट शर्यतीचे आयोजन
  • याआधी २००४मध्ये मुंबईत यूआयएम विश्व एफ १ सीरिज शर्यत झाली होती
  • ३ ते ५ मार्च या कालावधीत पॉवरबोट शर्यत
  • ७ संघांचा समावेश; प्रत्येक संघाच्या दोन बोटी
  • २८ शर्यतपटू; त्यात दोन भारतीय खेळाडूंचा सहभाग