इंडियन प्रीमियर लीग नामक आर्थिक खाण मिळवून देणाऱ्या स्पध्रेप्रमाणेच भारतीय क्रिकेटच्या अनेक मोठमोठय़ा आर्थिक व्यवहारांमध्ये पुढाकार घेऊन नायक झालेले आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी गेली तीन वष्रे खलनायक ठरले आहेत. परंतु बुधवारी बीसीसीआयने या वादग्रस्त प्रशासकाच्या क्रिकेट कारकिर्दीला अखेर पूर्णविराम दिला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) झालेल्या विशेष सर्वसाधारण बैठकीमध्ये मोदींना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आजीवन बंदीची शिक्षा ठोठावली. बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीने त्यांना अनुशासनहिनता आणि गैरवर्तन यांसदर्भातील आठ आरोपांबाबत दोषी ठरवून ही कारवाई केली.
बुधवारचा दिवस मोदी आणि बीसीसीआय यांच्यातील न्यायालयीन लढायांमुळे नाटय़मय ठरला. बीसीसीआयची विशेष सर्वसाधारण सभा फक्त अध्र्या तासात आटोपली. परंतु ४९ वर्षीय प्रशासक मोदी यांच्यावर आजीवन बंदीचा निर्णय मात्र एकमताने घेण्यात आला.
आयपीएलच्या यशाचा शिल्पकार म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या मोदी यांनी आपली प्रशासकीय कारकीर्द वाचवण्यासाठी बुधवारी अखेपर्यंत प्रयत्न केले. त्यांनी बीसीसीआयच्या कार्यकारिणी सदस्यांनी पत्रे लिहून आपली कारकीर्द वाचवण्यासाठी आर्जवी विनंती केली होती
‘‘कार्यकारिणी समितीमधील एकाही सदस्याने मोदी यांची पाठराखण केली नाही आणि एकमताने त्यांच्यावर आजीवन बंदीचा निर्णय घेण्यात आला,’’ असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
अरुण जेटली आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांचा समावेश असलेल्या बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीने जुलैमध्ये आपला १३४ पानी अहवाल सादर केला होता. यात आर्थिक गैरव्यवहार, गैरवर्तणूक आणि बीसीसीआयचे नुकसान करणाऱ्या कारवाया यासंदर्भातील आठ आरोपांबाबत त्यांना दोषी ठरवण्यात आले.
मोदी यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळताना हा बीसीसीआयचा अंतर्गत निर्णय असल्याचे म्हटले. परंतु तोवर सर्व सदस्यांना शिस्तपालन समितीचा अहवाल देण्यात आला होता.
मोदी यांच्यावरील कारवाईसाठी तीन वर्षांची प्रतीक्षा
जुलै २०१०पासून मोदी यांना शिस्तपालन समितीने अनेकदा सुनावणीसाठी बोलावले होते. परंतु वैयक्तिकपणे ते एकदाही हजर राहिले नव्हते. जिवाला धोका असल्याचे कारण दाखवत मोदी सध्या लंडनमध्ये निवास करीत आहेत.
मुंबईत आयपीएलची अंतिम फेरी झाल्यानंतर काही क्षणांत २५ एप्रिल २०१० या दिवशी बीसीसीआयच्या घटनेतील कलम ३२(४)चा भंग केल्याप्रकरणी मोदी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर बीसीसीआयने त्यांच्यावर तीन कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या. मोदींनी या तिन्ही नोटिसांना उत्तर पाठवले होते.
२०१०च्या आयपीएल मोसमात पुणे वॉरियर्स आणि कोची टस्कर्स हे दोन नवे संघ सामील करण्यात आले. यासंदर्भातील लिलावानंतर मोदी यांचा उंचावणारा आलेख घसरायला सुरुवात झाली. मोदी यांनी कोची फ्रेंचायझीच्या मालकीसंदर्भातील माहिती ‘ट्विटर’वर जाहीर केली होती. त्यामुळे शशी थरूर यांना आपले केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्रिपद गमवावे लागले होते. मोदी यांनी बीसीसीआय आणि आयपीएल फ्रेंचायझी यांच्यातील गोपनीयतेसंदर्भातील कराराचा भंग केला होता. त्यामुळेच एप्रिल २०१०मध्ये त्यांची आयपीएलचे प्रमुख आणि आयुक्त या पदांवरून हकालपट्टी करण्यात आली. निलंबनाचे पत्र आणि २२ आरोप असलेले ३४ पानी पत्र मोदी यांना ई-मेलद्वारे पाठविण्यात आले होते.
मोदी गेली तीन वष्रे आपण निर्दोष असल्याचा बचाव ट्विटर आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते करीत होते. परंतु बीसीसीआयच्या समितीसमोर वैयक्तिकपणे सामोरे जाण्याचे त्यांनी टाळले होते.

मोदींमुळे बीसीसीआयची कोटी कोटी उड्डाणे
ललित मोदी यांनी २९ नोव्हेंबर २००५ मध्ये बीसीसीआयवर सत्तास्थान मिळविले. २६ एप्रिल २०१०मध्ये त्यांची मंडळातून हकालपट्टी होईपर्यंतच्या कालावधीत त्यांनी मंडळाला जगातील श्रीमंत क्रिकेट संघटना म्हणून नावलौकिक मिळवून दिला. चार वर्षांमध्ये त्यांनी ४७ हजार ६०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले.

मोदी यांच्या काळातील काही महत्त्वपूर्ण करार-
*  भारतीय संघासाठी सहारा थिन्यामुक्कीमबरोबर चार वर्षांकरिता ४१५ कोटी रुपयांचा करार (२०/१२/२००५).
*  भारतीय संघासाठी नाईके कंपनीबरोबर चार वर्षांकरिता २१५ कोटी रुपयांचा करार (२४/१२/२००५).
*  प्रसारमाध्यम हक्कांबद्दल निम्बसबरोबर चार वर्षांकरिता ६१२ दशलक्ष डॉलर्सचा करार (१८/२/२००६).
*  परदेशातील सामन्यांच्या प्रसारमाध्यम हक्कांसाठी झी समूहाबरोबर चार वर्षांकरिता २१९ दशलक्ष डॉलर्सचा करार (७/४/२००६).
*  डब्ल्यूएसजी कंपनीबरोबर बीसीसीआय प्रायोजकत्व करार १७३ कोटी रुपये (२७/८/२००७).
*  आयपीएलच्या आठ फ्रँचाईजींच्या विक्रीबद्दल ७२३.५९ दशलक्ष डॉलर्सचा करार (२४/१/२००८).
*  ट्वेन्टी-२० सामन्यांच्या जगभर प्रसारणाच्या हक्कांसाठी ईएसपीएनबरोबर २००८ मध्ये एक अब्ज डॉलर्सचा करार.
*  आयपीएल प्रसारमाध्यम हक्कांसाठी १.२६ अब्ज डॉलर्सचा करार (१५/१/२००८).
*  वेब मीडियाबरोबर सामन्यांचे थेट प्रक्षेपणाच्या हक्कांसाठी ५० दशलक्ष डॉलर्सचा करार (१८/४/२००८).
*  भारतीय मैदानांवरील भारताचे आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या प्रक्षेपणासाठी निम्बसबरोबर चार वर्षांकरिता ४३१ दशलक्ष डॉलर्सचा करार (ऑक्टोबर २००९).
*  आयपीएल करमणूक कार्यक्रमांकरिता व्हियाकोम कंपनीबरोबर ३० दशलक्ष डॉलर्सचा करार.
पुणे व कोची फ्रँचाईजींकरिता अनुक्रमे सहारा परिवार व रेंडेझुअस समूहाबरोबर ७०३ दशलक्ष डॉलर्सचा करार (२१/३/२०१०).

बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेचा निर्णय
** बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये शिस्तपालन समितीच्या अहवालावर चर्चा करण्यात आली. ललित कुमार मोदी यांच्यावर बीसीसीआयच्या नियम आणि शर्तीबाबतच्या घटनेतील कलम ३२ (४) अनुसार कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.
..ललित मोदी हे गंभीर अनुशासनहिनता आणि गैरवर्तन केल्याप्रकरणी दोषी असल्याने आपल्या अधिकारांचा वापर करून त्यांनी कलम ३२चा भंग केला आहे. त्यामुळे मोदी यांच्यावर बीसीसीआयकडून आजीवन बंदीची कारवाई करण्यात येत आहे.
मोदी यापुढे कधीही बीसीसीआय अथवा संलग्न संघटनांच्या कार्यकारिणी वा कार्यालयात कोणतेही पद भूषवू शकणार नाही. याचप्रमाणे कोणत्याही समितीवरील पदावर कार्यरत राहू शकणार नाही.’’

द्विसदस्यीय शिस्तपालन समिती
मोदी यांची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या त्रिसदस्यीय शिस्तपालन समितीमध्ये आधी बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा समावेश होता. परंतु त्यानंतर श्रीनिवासन यांनी स्वत:चे नाव वगळल्यामुळे आयपीएलचे तत्कालीन प्रमुख चिरायू अमिन यांचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर अमिनसुद्धा समितीमधून बाहेर पडल्यानंतर द्विसदस्यीय समितीलाच हा अहवाल तयार करावा लागला होता.

बंदीविरोधात न्यायालयात आव्हान देणार -अबदी
मुंबई : ललित मोदी यांच्यावरील आजीवन बंदीवर टीका करत त्यांचे वकील मेहमूद अबदी यांनी या निर्णयाला न्यायालयात आव्हान देणार असल्याचे म्हटले आहे.
** शिस्तपालनासंदर्भाती ही संपूर्ण प्रक्रिया ही वैयक्तिक पक्षपाती होती. आम्ही न्यायाच्या कक्षेत राहून यासंदर्भात न्यायालयात आव्हान करू. याचप्रमाणे हितसंबंध जपणाऱ्या अनेक व्यक्तींचे मुखवटे फाडून टाकू,’’ असे अबदी यांनी सांगितले.
** मोदी यांच्यावर बंदीची कारवाईचे झाल्याचे मला प्रसारमाध्यमांकडूनच कळले. बीसीसीआयच्या निर्णयपत्राची आम्ही वाट पाहात आहोत. शिस्तपालन समितीच्या अहवालाला आव्हान करण्याचा आम्ही विचार करीत आहोत,’’ असे ते पुढे म्हणाले.
** बीसीसीआयला जो काही निर्णय घ्यायचा होता तो त्यांनी घेतला, पण अखेरचा निर्णय माझाच असेल. मी काही कुठेही जाणार नाही, इथेच असेन. आयपीएलचा मी जन्मदाता आहे. आयपीएलमध्ये अजूनही काही सुधारणा मला करायच्या आहेत. आयपीएलचे नियम अजून सक्षम आणि पारदर्शक करायचे आहेत.’’
-ललित मोदी
** मोदी यांच्यावर आजीवन बंदीची शक्यता
** ललित मोदींवर बीसीसीआयचे आठ आरोप