भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा इंग्लंड क्रिकेट मंडळाकडे प्रस्ताव

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटचा १४वा हंगाम पूर्ण करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) उत्सुक आहे. ‘आयपीएल’च्या दुसऱ्या टप्प्यासाठी भारत-इंग्लंड कसोटी मालिकेला कात्री लावण्यासाठी ‘बीसीसीआय’ची इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाशी (ईसीबी) चर्चा सुरू आहे.

‘बीसीसीआय’ला ‘आयपीएल’चे उर्वरित ३१ सामने खेळवून हंगाम पूर्ण करायचा असून, याकरिता भारताबाहेरील इंग्लंड हा एक पर्याय उपलब्ध आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध ४ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीतच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यामुळे या मालिकेतील सामने कमी करण्याच्या पर्यायावर ‘बीसीसीआय’ गांभीर्याने विचार करीत आहे. ‘आयपीएल’ची प्रक्षेपण वाहिनी स्टार स्पोर्ट्सनेसुद्धा याबाबत अनुकूलता दर्शवली आहे.

‘‘पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील सामने कमी करून ‘आयपीएल’चा दुसरा टप्पा खेळवण्याबाबत चर्चा सुरू आहे. ‘आयपीएल’द्वारे कमाईच्या उद्देशाने ‘ईसीबी’ची मान्यता मिळण्याची दाट शक्यता आहे,’’ असे ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी सांगितले.