राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच स्पर्धा आयोजनाला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे सरकारच्या प्रमाणित कार्यप्रणालीचा अभ्यास करून राज्यातील शरीरसौष्ठवाच्या स्पर्धाना लवकरच प्रारंभ होण्याची शक्यता आहे.

गेल्या ११ महिन्यांपासून जवळपास संपूर्ण क्रीडाविश्व ठप्प असतानाच शरीरसौष्ठवपटू मात्र जय्यत तयारी करण्यासाठी स्पर्धा सुरू होण्याची वाट पाहत आहेत. ‘‘केंद्र सरकारने प्रमाणित कार्यप्रणाली जाहीर केल्याने ‘भारत-श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. एप्रिलअखेरीस होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवण्यासाठी राज्यातील शरीरसौष्ठवपटू उत्सुक आहेत. त्यामुळे पुढील महिन्यात बैठक घेऊन शरीरसौष्ठव स्पर्धाच्या आयोजनाबाबत ठोस निर्णय घेण्यात येईल,’’ असे ग्रेटर बॉम्बे शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस राजेश सावंत यांनी सांगितले.

ते म्हणाले की, ‘‘लवकरच ‘कनिष्ठ मुंबई-श्री’, ‘मुंबई-श्री’ आणि ‘महाराष्ट्र-श्री’ या प्रतिष्ठेच्या स्पर्धाच्या आयोजनाबाबत निर्णय घेण्यात येईल. काही कारणास्तव स्पर्धा घेणे शक्य न झाल्यास, तयारीत असलेल्या शरीरसौष्ठवपटूंना बोलावून निवड चाचणी स्पर्धा घेण्यात येईल. त्याद्वारे ‘भारत-श्री’ स्पर्धेसाठी मुंबई आणि राज्याचा संघ निवडण्यात येईल.’’

मुंबई शहर आणि उपनगरची कार्यकारिणी जाहीर

मुंबई शहर आणि उपनगर संघटनेच्या रविवारी झालेल्या निवडणुकीत दोन्ही संघटनांची कार्यकारिणी निवडण्यात आली.

* मुंबई शहरची कार्यकारिणी : अध्यक्ष- अजय खानविलकर, सरचिटणीस- राजेश सावंत, खजिनदार- राजेंद्र गुप्ता, उपाध्यक्ष- स्पेन्सर जॉ, सहचिटणीस- राजेश निकम, सदस्य- मधुकर तळवलकर, चेतन पाठारे, हेमचंद्र पाटील, विनायक पुजारी, राजेंद्र गोमाई, संतोष येडवे, जयदीप पवार, सचिन फुटाणे, सुभाष जाधव, प्रशांत खामकर, विजय चिंदरकर, भरत सावंत, सचिन जाधव, शिवाजी गुजर.

* मुंबई उपनगरची कार्यकारिणी : अध्यक्ष- अमोल कीर्तीकर, सरचिटणीस- सुनील शेडगे, खजिनदार- संतोष पवार, उपाध्यक्ष (३)- शंकर कांबळी, किटी फोंसेका, प्रवीण पाटकर, सहचिटणीस- राम नलावडे, सदस्य- अ‍ॅड. विक्रम रोठे, आनंद गोसावी, अशोक शेलार, विशाल परब, गिरीश कोटियन, संतोष तावडे, अब्दुल मुकादम, हिरल शेट-शाह.