आठवडय़ाची मुलाखत : चेतन पाठारे, भारतीय शरीरसौष्ठव महासंघाचे सरचिटणीस

तुषार वैती, मुंबई</strong>

करोनामुळे शरीरसौष्ठव या खेळात कारकीर्द घडवणाऱ्या तब्बल ९० टक्के लोकांची उपजीविका धोक्यात आली आहे. येत्या काही महिन्यांत सर्व काही पूर्वपदावर येण्याची शक्यता कमी असल्यामुळे शरीरसौष्ठवपटूंसमोर उपजीविके चा प्रश्न निर्माण झाला आहे. शरीरसंपदा कमावण्यासाठी महिन्याला हजारो रुपयांचा खर्च करावा लागतो, पण हा खर्च करण्यासाठी खेळाडूंकडे पैसेच नाहीत. त्यामुळे करोनाचा शरीरसौष्ठवला मोठा हादरा बसला आहे, असे मत भारतीय शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस चेतन पाठारे यांनी व्यक्त केले.

करोनामुळे शरीरसौष्ठव या खेळापुढील आव्हाने अधिक गंभीर बनली आहेत. या आव्हानांविषयी तसेच शरीरसौष्ठवच्या पुढील भवितव्याविषयी पाठारे यांच्याशी केलेली ही बातचीत-

* करोनामुळे शरीरसौष्ठव या खेळावर कितपत परिणाम झाला?

शरीरसौष्ठव या खेळाला करोनाचा मोठा फटका बसला. मार्च महिन्यात इंदूर येथे ‘भारत-श्री’ स्पर्धा होणार होती. त्यासाठी खेळाडूंच्या तिकिटाचे आणि स्टेडियमचे सर्व पैसे आम्ही भरले होते. करंडकही तयार करण्यात आले होते. राज्य स्तरावर चमकलेला प्रत्येक शरीरसौष्ठवपटू या स्पर्धेसाठी कसून तयारी करत होता. पण या सर्वाची मेहनत आणि आमचे पैसे वाया गेले, असेच म्हणावे लागेल. ‘भारत-श्री’पाठोपाठ ‘आशिया-श्री’ आणि ‘जागतिक-श्री’ स्पर्धा रद्द केल्याने खेळाडूंचे नुकसान झाले आहे. या स्पर्धाद्वारे मिळणाऱ्या गुणांमुळे काहींना पदोन्नतीसाठी तसेच राज्य पुरस्कारांसाठी प्राप्त ठरता येते. मात्र करोनामुळे शरीरसौष्ठवपटूंची ही संधी यंदा हुकली, असेच म्हणावे लागेल.

* अनेक खेळांच्या सरावाला सुरुवात करण्यासाठी हिरवा कं दील मिळत असताना जिम, व्यायामशाळांबाबत सरकारची उदासीनता का?

भारतीय शरीरसौष्ठव महासंघाने करोनाच्या सुरुवातीच्या काळात पंतप्रधान साहाय्यता निधीत चार लाख रुपयांची रक्कम जमा के ली होती. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या क्षेत्रातील ९० टक्के   लोकांची उपजीविका ही या खेळावर अवलंबून आहे. तसेच तंदुरुस्तीविषयक उपकरणांना लावण्यात येणारा वस्तू व सेवा कर कमी करण्याची मागणी के ली होती. जिम किं वा व्यायामशाळांमध्ये सामाजिक अंतराचा नियम बाळगणे अशक्य आहे. त्याचबरोबर मुखपट्टय़ा लावून व्यायाम करणे घातक आहे, कारण नाकावाटे सोडला जाणारा कार्बन डायऑक्साइड पुन्हा शरीरात जाण्याची शक्यता आहे. राज्य सरकारलाही याबाबत सुरक्षित वाटत नसल्यामुळेच अद्याप जिम, व्यायायमशाळा सुरू करण्यासाठी ते अनुकू ल नसावेत.

* सध्या चिनी उपकरणांवर बंदी घालण्याची मागणी जोर धरत असताना शरीरसौष्ठव महासंघाची यात काय भूमिका आहे?

भारतीय शरीरसौष्ठव संघटना कोणतीही उपकरणे विकत घेत नसल्यामुळे त्या वापरण्याची सक्ती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण चिनी उपकरणांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय लोकांच्या मनात रूढ होत असून त्यामुळे स्थानिकांना वाव मिळू शके ल. सध्या या क्षेत्रात उपकरणे प्रदान करणाऱ्या अनेक भारतीय कंपन्या आहेत. दोन महिन्यांपूर्वी आम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उपकरणांचे डिझाइन तयार करण्यासाठी तसेच तळोजा येथे उत्पादन सुरू करण्यासाठी पावले उचलली आहेत.

* खेळाडूंवर टाळेबंदीचा कितपत परिणाम झाला?

जिम, व्यायामशाळा, वैयक्तिक प्रशिक्षण, स्पर्धेतून मिळणारी रक्कम तसेच उपजीविके चे सर्वच मार्ग बंद असल्यामुळे खेळाडूंची वाईट अवस्था झाली आहे. त्याचबरोबर शरीरसौष्ठव हा बिगरऑलिम्पिक खेळ असल्यामुळे चाहत्यांना स्पर्धेसाठी उपस्थित राहण्याची परवानगी नाकारली तर पुरस्कर्तेही मदत करण्यासाठी पुढे येणार नाहीत.