News Flash

शरीरसौष्ठव संघटनांमध्ये मनोमीलनाचे संकेत

राष्ट्रीय स्तरावरील या दोन्ही संघटना एकत्र आल्यास खेळ आणि खेळाडूंचाच फायदा होणार आहे.

‘बॉडी एक्सपो’मध्ये भारतीय शरीरसौष्ठवपटू महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसह भारतीय शरीरसौष्ठव महासंघाचे महासचिव सुरेश कदम (मध्यभागी).

रविवारी गोरेगावमध्ये झालेल्या ‘बॉडी एक्सपो’ या कार्यक्रमात भारतीय शरीरसौष्ठवपटू महासंघाने अखिल भारतीय स्पर्धेचे आयोजन केले होते, या वेळी भारतीय शरीरसौष्ठव महासंघाचे महासचिव सुरेश कदम यांनी उपस्थिती लावली होती. या वेळी दोन्ही संघटनांमध्ये भेटीगाठी झाल्या,  जून्या आठवणींना उजाळा मिळाला, या  साऱ्या गोष्टींचा विचार केल्यास दोन्ही संघटनांमध्ये मनोमीलन होण्याचे संकेत मिळत आहेत.

एका खेळाची एकच संघटना असली तर विकास चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. शरीरसौष्ठव हा जनमानसात रुजलेला खेळ. साध्या रस्त्यावरच्या स्पर्धानाही पाच हजारांपर्यंत गर्दी होते. पण विविध संघटनांमुळे हा खेळ संघटनात्मक स्तरावर मोठी मजल मारताना दिसत नाही. पण राष्ट्रीय स्तरावरील या दोन्ही संघटना एकत्र आल्यास खेळ आणि खेळाडूंचाच फायदा होणार आहे.

‘भारतीय शरीरसौष्ठवपटू महासंघ चांगले काम करत आहे. त्यांनी चांगल्या स्पर्धा घेतल्या आहेत आणि बऱ्याच शरीरसौष्ठवपटूंना चांगले व्यासपीठ मिळवून दिले आहे. त्यांचे कार्य योग्य पद्धतीने सुरू आहे,’ असे म्हणत कदम यांनी एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत.

तुम्ही शरीरसौष्ठवपटू महासंघाबरोबर एकत्र येणार का, असा थेट प्रश्न विचारल्यावर कदम यांनी सूचकपणे उत्तर दिले, ते म्हणाले की, ‘आताच्या घडीला तर आम्ही सर्व एकत्रच आलो आहोत. आम्ही खेळ आणि खेळाच्या विकासासाठीच कटिबद्ध आहोत. त्यामुळे यापुढे शरीरसौष्ठव खेळासाठी अधिक चांगले काम करण्याची इच्छा आहे.’

याबाबत भारतीय शरीरसौष्ठव महासंघाचे महासचिव चेतन पाठारे म्हणाले की, ‘भारत सरकारने आमच्या संघटनेला २०१२ साली मान्यता दिली. त्या वेळी काही संघटना आमच्या विरोधात न्यायालयात गेल्या होत्या. पण त्यानंतर आता सलग सात वर्षे आम्हालाच सरकारची मान्यता आहे. त्यामुळे या संघटनेच्या छत्रछायेखाली खेळाचा चांगला विकास होऊ शकतो. आम्ही गेल्या काही वर्षांमध्ये खेळाडूंच्या रोख पारितोषिकांमध्ये पाच पटीने वाढ केली आहे. त्यामुळे जर खेळाच्या विकासासाठी ही संघटना आमच्याबरोबर एकत्र काम करण्यास तयार असेल, तर आम्ही त्यांचे स्वागतच करू. यापूर्वीही या महासंघाशी जुळवून घ्यायचे प्रयत्न झाले, पण ते अपयशी ठरले. पण या वेळी आम्ही एकत्र येऊ अशी आशा मला आहे.’

‘गेल्या सहा वर्षांमध्ये कदम यांचा भारतीय शरीरसौष्ठवपटू महासंघाच्या कामकाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. पण कदम यांना संघटनांतील सर्व पदाधिकाऱ्यांना समजावणे, सोपे नाही. कदम यांच्या मनात भारतीय शरीरसौष्ठवपटू महासंघाबरोबर येण्याचा विचार नक्की आहे, कारण कदम हे खेळाडूंच्या हितासाठी सर्वस्व पणाला लावणारे आहेत. आतापर्यंत त्यांनी बऱ्याच खेळाडूंना व्यासपीठ मिळवून दिले आहे. त्यामुळे त्यांनी संकुचित विचार केला नाही, तर दोन्ही संघटनांमध्ये मनोमिलन नक्की होऊ शकते,’ असे सूत्रांनी सांगितले.

जर या दोन संघटना एकत्र आल्या तर खेळाडूंच्या मनात नेमके कुठून खेळायचे, ही द्विधा अवस्था राहणार नाही. दोन्ही महासंघातील शरीरसौष्ठवपटू एकत्र आले तर खेळ अधिक सुदृढ होण्यास मदत होऊ शकेल. त्याचबरोबर खेळाडूंना सरकारकडून मिळणारी आर्थिक मदत आणि नोकरी मिळू शकेल. पाठारे यांनी भारतीय शरीरसौष्ठव महासंघाला एकत्र येण्यासाठी पायघडय़ा घातलेल्या आहेत. त्यामुळे खेळ आणि खेळाडूंच्या विकासासाठी कटिबद्ध असलेले कदम आपल्या संघटनेसह पाठारे यांच्या महासंघामध्ये विलीन होणार का, याचीच प्रतीक्षा क्रीडाप्रेमींना असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2017 1:07 am

Web Title: bodybuilding organizations
Next Stories
1 मेस्सीच्या गोलमुळेच बार्सिलोनाचा पराभव टळला
2 तुमचं क्रिकेट सुधारा, अन्यथा घरी बसा; चॅपेल यांची पाकिस्तानला तंबी
3 ‘सातत्यपूर्ण कामगिरी कशी करायची, हे विराटकडून शिकण्याची इच्छा’
Just Now!
X