आयपीएल सामन्यांमुळे स्टेडियमवर होणाऱया पाण्याच्या उधळपट्टीवरून मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मुंबई क्रिकेट असोसिएशनला(एमसीए) तात्पुरता दिलासा मिळाला आहे. येत्या शनिवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱया आयपीएलच्या पहिला सामना खेळविण्याची परवानगी कोर्टाने दिली असून, याप्रकरणाची पुढील सुनावणी १२ एप्रिल रोजी होणार आहे.

दुष्काळ आणि पाणीटंचाईने महाराष्ट्रात उग्र रूप धारण केले असताना आणि अनेक भागांत पाणीपुरवठा यंत्रणांना पोलीस संरक्षण द्यावे लागत असताना कित्येक लाख लिटर पाण्याची नासाडी करणाऱ्या ‘आयपीएल’ सामन्यांवर मुंबई हायकोर्टाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ‘आयपीएल महत्त्वाचे की लोक’, असा थेट सवाल कोर्टाने राज्य सरकार आणि क्रिकेट संघटनांना केला होता.

पाणीचंगळ कशाला?

गुरूवारी झालेल्या सुनावणीत एमसीएची बाजू मांडणाऱया वकिलांनी आपल्या युक्तीवादात स्टेडियमवर वापरण्यात येणारे पाणी पिण्यायोग्य नसते, अशी माहिती न्यायालयाला दिली. सामन्याच्या दिवशी खेळपट्टी कोरडी ठेवणे भाग असल्यामुळे त्यादिवशी पाणी वापरले जात नाही, असेही वकिलांनी सांगितले. याशिवाय, आयपीएलचे वेळापत्रक महिनाभर आधीच जाहीर करण्यात आले असतानाही स्पर्धा सुरू होण्याच्या केवळ चार दिवसआधी याचिका दाखल का केली गेली? असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला. एमसीएच्या या युक्तीवादावर न्यायाधीशांनी पुन्हा एकदा ताषेरे ओढले. माणसांच्या जीवापेक्षा खेळाला प्राधान्य दिले जावे, असे तुम्हाला सुचवायचे आहे का? पाण्याअभावी माणसांचे जीव जात असताना तुम्हाला तूमच्या खेळपट्ट्या जास्त महत्त्वाच्या वाटतात का? असा सवाल न्यायाधीशांनी उपस्थित केला.

अग्रलेख- पाणी पेटणार!

ऐनवेळी स्पर्धेचे वेळापत्रक बदलणे शक्य नसल्याचे ‘बीसीसीआय’च्यावतीने कोर्टात सांगण्यात आले. त्यावर न्यायालयाने आम्हाला तुमच्या वेळापत्रकाचे काहीही पडलेले नाही, असे सांगत टँकरने पुरवल्या जाणाऱया पाण्याच्या स्त्रोतांची चौकशी करण्याचे आदेश दिले. याशिवाय, पावसाळा लांबला आणि तीव्र पाणी टंचाई झाली तर सरकारने आपत्कालीन योजना आखली आहे का?, स्टेडियमला पाणी पुरवठा कुठून होणार? विहीरी आणि विंधन विहीरींमधून पाणी मिळविण्याचा सरकारचा काही विचार आहे का? पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर एप्रिल आणि मे महिन्यात लग्न सोहळे व इतर कार्यक्रमासंदर्भात पाणी वापरावर सरकारने काही निर्बंध घातले आहेत का? अशा प्रश्नांची सरबत्तीच हायकोर्टाने सुरू केली व आयपीएल प्रकरणाबाबत १२ रोजी निर्णय देणार असल्याचे स्पष्ट केले.