मोहालीमध्ये खेळवण्यात आलेल्या आणि श्रीलंकेत ऑनलाइन प्रसारण करण्यात आलेल्या ट्वेन्टी-२० सामन्याप्रकरणी कथित सट्टेबाज रवींद्र दांडीवाल याला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चंडीगड गाठले आहे.

गेल्या महिन्यात हा सामना झाल्याने बीसीसीआयचा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पंजाब पोलीस तसेच श्रीलंका क्रिके ट मंडळाचे लक्ष वेधले गेले होते. ‘‘या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार असलेल्या रवींद्र दांडीवालला सोमवारी अटक करण्यात आली आहे. ऑनलाइन प्रसारित करण्यात आलेल्या ट्वेन्टी-२० सामन्याच्या चौकशीसाठी दांडीवालला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी दांडीवालची भूमिका काय आहे, याचा तपास के ला जाणार आहे,’’ असे खरारचे पोलीस उपअधीक्षक पाल सिंग यांनी सांगितले. पंजाब पोलिसांनी काही लॅपटॉप, मोबाइल फोन आणि महत्त्वाची कागदपत्रेही जप्त केली आहेत. याप्रकरणी आधीच दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या सर्वाच्या चौकशीतून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मूळ राजस्थानचा असलेल्या दांडीवालने याआधीही अनधिकृत स्पर्धा आयोजित केल्या आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

चंडीगडपासून १६ किलोमीटर अंतरावर असलेल्या सावरा गावात २९ जून रोजी हा सामना खेळवण्यात आला होता.  ट्वेन्टी-२० लीग म्हणून श्रीलंकेत प्रक्षेपण झाले होते.

दांडीवालबाबत असलेली माहिती आम्ही पंजाब पोलिसांना देणार आहोत. तसेच त्यांच्याकडूनही माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमचे पथक दिल्लीहून चंडीगडला रवाना झाले आहे.

– अजित सिंग, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख