भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूचनेनुसार मालिकेच्या वेळापत्रकातील बदलाबाबत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार अ‍ॅलन बॉर्डरने ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ मंडळावर टीका केली आहे. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सिडनी कसोटीच्या नियोजनात बदलासंदर्भात बॉर्डरने नाराजी प्रकट केली आहे.

सिडनीतील कसोटी नववर्षांच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात अपेक्षित होती. त्यामुळे ७ जानेवारीपासून या कसोटीला प्रारंभ होण्याची शक्यता होती. परंतु ‘बीसीसीआय’ आणि ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ अंतिमीकरण न झालेल्या वेळापत्रकात बदलाचा विचार करीत आहे. पूर्वनियोजित वेळापत्रकात २५ ते ३० नोव्हेंबरला ब्रिस्बेन येथे एकदिवसीय मालिका झाल्यानंतर ४ ते ८ डिसेंबरदरम्यान ट्वेन्टी-२० मालिकेचा समावेश होता. मग चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अ‍ॅडलेडला होणार आहे. पहिला सामना ब्रिस्बेनला व्हायला हवा होता, असे बॉर्डर यांचे म्हणणे आहे.