युरोपा लीग फुटबॉल

मिशी बॅटशुयीच्या दोन गोलच्या जोरावर बोरुसिया डॉर्टमंड क्लबने युरोपा फुटबॉल लीगमध्ये अटलांटावर ३-२ असा निसटता विजय मिळवला. बॅटशुयीने भरपाई वेळेत केलेला गोल निर्णायक ठरला. डॉर्टमंडने उपउपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या टप्प्यात आघाडी घेत पुढील फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित केला आहे. दुसरीकडे आर्सेनलने ३-० अशा फरकाने अ‍ॅस्टरसंडवर, अ‍ॅटलेटिको माद्रिदने ४-१ अशा फरकाने कोपनहॅगनवर आणि लैपझीगने ३-१ अशा फरकाने नॅपोलीवर आश्चर्यकारक विजय मिळवला.

अँड्रे स्कूरलच्या (३० मि.) गोलच्या जोरावर डॉर्टमंडने पहिल्या सत्रात १-० अशी आघाडी घेतली. मात्र, त्यांना मध्यंतरानंतर अटलांटा क्लबने धक्के दिले. जोसीप इलिसीसने (५१ व ५६ मि.) सलग दोन गोल करताना अटलांटाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. सामना रंगतदार अवस्थेत असताना बॅटशुयीने ६५व्या मिनिटाला बरोबरीचा गोल केला. निर्धारित ९० मिनिटांच्या खेळात ही बरोबरी कायम राहील्याने प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली, परंतु बॅटशुयीने भरपाई वेळेच्या पहिल्याच मिनिटाला अप्रतिम गोल करून सामन्याचे चित्र पालटले. त्याच्या या गोलने डोर्टमंडने हातातून निसटलेल्या सामन्यात ३-२ असा विजय मिळवला.

अन्य लढती

आर्सेनल ३ (नॅचो मोनरील १३, पॅपगियानोपॉलोस स्वयंगोल, मेसूट ओझील) वि. वि. अ‍ॅस्टरसंड ०; अ‍ॅटलेटिको माद्रिद ४ (सॉल निग्यूझ, के. गॅमेरो , अ‍ॅटोइनो ग्रिएझमन, व्हिटोलो )वि. वि. कोपनहॅगन १ (व्हिक्टर फिशर); लैपझीग ३ (टी. वेर्नर २, ब्रुमा ) वि. वि. नॅपोली १ (ओनस).