*  बोरुसिया डॉर्टमंडचा ४-१ने विजय
*  रॉबर्ट लेवानडोव्हस्कीचे चार गोल
आघाडीवीर रॉबर्ट लेवानडोव्हस्की याने केलेल्या चार गोलांच्या बळावर बोरुसिया डॉर्टमंडने घरच्या मैदानावर स्पॅनिश लीगमधील बलाढय़ संघ समजल्या जाणाऱ्या रिअल माद्रिदचा ४-१ असा धुव्वा उडवला. उपांत्य फेरीच्या पहिल्या टप्प्यातील सामन्यातील मोठय़ा विजयामुळे बोरुसिया डॉर्टमंडचा चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित मानला जात आहे.
बायर्न म्युनिचने उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात बार्सिलोनाचा ४-० असा दणदणीत पराभव केल्यानंतर बोरुसिया डॉर्टमंडने धडाकेबाज कामगिरीचे प्रदर्शन करत रिअल माद्रिदचे आव्हान लिलया परतवून लावले. आता वेम्बले येथे मे महिन्यात होणाऱ्या अंतिम फेरीच्या सामन्यात जर्मनीचे दोन्ही संघ आमनेसामने असण्याची शक्यता अधिक आहे. २०१४च्या नंतर करार पुढे वाढवण्यास नकार दिल्यामुळे बोरुसिया संघातून लवकरच बाहेर पडणारा पोलंडचा आंतरराष्ट्रीय खेळाडू लेवानडोव्हस्की हा चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीत चार गोल झळकावणारा पहिला फुटबॉलपटू ठरला आहे.
आठव्या मिनिटालाच लेवानडोव्हस्कीने डॉर्टमंडचे खाते खोलल्यानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डो याने मध्यंतराच्या दोन मिनिटे आधी रिअल माद्रिदला बरोबरी साधून दिली. पण रिअल माद्रिदचा हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. पाच मिनिटांच्या अंतराने लेवानडोव्हस्कीने दोन गोल करत रिअल माद्रिदच्या आक्रमणातील हवा काढून टाकली. दुसऱ्या सत्रात तीन गोल लगावत लेवानडोव्हस्कीने डॉर्टमंडला मोठय़ा फरकाने विजय मिळवून दिला. १-४ अशा फरकाने पराभूत झाल्यामुळे रिअल माद्रिदचे आव्हान खडतर झाले आहे. अंतिम फेरी गाठायची असल्यास, रिअल माद्रिदला मंगळवारी घरच्या मैदानावर होणाऱ्या दुसऱ्या टप्प्याच्या लढतीत चमत्कार घडवावा लागणार आहे. ‘‘आत्मविश्वासाचा अभाव आणि चांगली कामगिरी करण्यात आम्ही कमी पडलो. दुसऱ्या टप्प्याच्या सामन्यात आम्ही जोमाने पुनरागमन करू, असा विश्वास आहे. आता आमच्याकडे फक्त ९० मिनिटे राहिलेली आहेत. पहिल्या मिनिटापासूनच आम्हाला कडवी लढत द्यावी लागेल,’’ असे रिअल माद्रिदचा बचावपटू सर्जीओ रामोस याने सांगितले.