चेक प्रजासत्ताकच्या पेत्रा क्विटोवाने विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील महिलांच्या एकेरीत दुसऱ्यांदा विजेतेपद मिळविण्यासाठी आगेकूच केली. तिला अंतिम फेरीत कॅनडाच्या एवगेनी बुचार्ड हिच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
२४ वर्षीय क्विटोवाने उपांत्य फेरीत ल्युसी साफारोवावर ७-६ (८-६), ६-१ अशी मात केली. तिने यापूर्वी २०११ मध्ये स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते. उपांत्य लढतीत तिला ल्युसीने पहिल्या सेटमध्ये चांगली झुंज दिली. दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी सहा सव्‍‌र्हिसगेम राखल्यानंतर टायब्रेकरचा उपयोग करण्यात आला. त्यामध्येही विलक्षण चुरस पाहायला मिळाली. अखेर टायब्रेकर ८-६ असा जिंकत क्विटोवाने पहिला सेट ५१ मिनिटांत आपल्या नावावर केला. दुसऱ्या सेटमध्ये क्विटोवाने दोन वेळा सव्‍‌र्हिसब्रेक मिळविला. या ब्रेकच्या आधारे तिने हा सेट केवळ २९ मिनिटांतजिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.
टेनिसमधील उद्योन्मुख खेळाडू म्हणून ख्याती मिळविलेल्या १३व्या मानांकित बुचार्डने तृतीय मानांकित सिमोनी हॅलेपवर ७-६ (७-५), ६-२ असा विजय मिळविला. दीड तास चाललेल्या या लढतीत पहिला सेट विलक्षण रंगतदार झाला. टायब्रेकरमध्येही चुरस पाहावयास मिळाली. बुचार्डने टायब्रेकर घेत पहिला सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये तिने दोन वेळा सव्‍‌र्हिसब्रेक मिळविला. सातव्या गेमच्या वेळी हॅलेपने सव्‍‌र्हिसब्रेक वाचविला. अखेर आठव्या गेमच्या वेळी सव्‍‌र्हिस राखून बुचार्डने सामना जिंकला.
पेस, सानियाची आगेकूच; बोपण्णाचे आव्हान संपुष्टात
भारताच्या लिएण्डर पेसने चेक प्रजासत्ताकच्या रॅडेक स्टेपानेकच्या साथीत दुहेरीची उपांत्य फेरी गाठली.  सानिया मिर्झाने विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील मिश्रदुहेरीत आगेकूच केली आहे. मात्र रोहन बोपण्णाचे मिश्र दुहेरीतील आव्हान संपुष्टात आले.
पुरुषांच्या दुहेरीत पेस व स्टेपानेक यांनी डॅनियल नेस्टॉर (कॅनडा) व निनाद झिमोझिंक (सर्बिया) यांना ३-६, ७-६ (७-५), ६-३, ६-४ असे पराभूत केले. सानियाने रुमानियाच्या होरिया तेकाऊच्या साथीने खेळताना उप-उपांत्यपूर्व फेरी गाठली. सानिया-होरिया जोडीने मेट पेव्हिक व बोजाना जोवानोव्हस्की यांच्यावर ६-३, ६-३ अशी मात केली. मिश्र दुहेरीतील लढतीत बोपण्णा व त्याची सहकारी आंद्रिया ल्हॅवाकोवा यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांना मिखाईल एल्गिन (रशिया) व अनास्ताशिया रोडिओनोवा (ऑस्ट्रेलिया) यांनी
३-६, ७-५, ६-३ असे पराभूत केले.