फिलिप ह्युजेसच्या मृत्यूमुळे गोलंदाजांनी आपले सर्वोत्तम अस्त्र म्यान करू नये, या भावनेने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेचा प्रारंभ उसळत्या चेंडूने (बाऊन्सर) व्हावा, अशी इच्छा ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मव्‍‌र्ह ह्युजेसने प्रकट केली आहे.
याबाबत मव्‍‌र्ह ह्युजेस म्हणाला की, ‘‘युवा फलंदाज फिलिपचा मृत्यू हा एक अपघात होता. असे घडायला नको होते. परंतु त्याचा परिणाम गोलंदाजांवर होऊन उसळते चेंडू क्रिकेटमधून बाद होऊ नयेत.’’
‘‘क्रिकेटमध्ये १०० वर्षांहून अधिक काळ उसळत्या चेंडूंचा वापर होत आहे. फिलिपच्या बाबतीत जे घडले, तो अपघात होता. लोकांच्या मनावर ठसलेले हे भय निघून जावे, याकरिता मालिकेची सुरुवातच उसळत्या चेंडूने व्हायला हवी,’’ असे ह्युजेसने सांगितले.